खिसा सैल सोडून नवीन वर्षांचे स्वागत करण्यात गुंतलेल्या तमाम देशवासीयांच्या मासिक खर्चात नवीन वर्षांच्या पहिल्या महिन्यापासूनच वाढ होणार आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात तब्बल २२० रुपयांनी वाढ करण्याचा ‘महाग’ निर्णय केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केला. त्यानुसार आता खुल्या बाजारात विनाअनुदानित सिलिंडर १२४१ रुपयांत उपलब्ध असेल तर मुंबईत त्याची किंमत १२६४ रुपये असेल. सध्या हे सिलिंडर १०३८ रुपयांना उपलब्ध आहे. प्रत्येक कुटुंबाला सध्या वर्षांकाठी नऊच अनुदानित सिलिंडर मिळतात. त्यानंतर लागणाऱ्या सिलिंडरची खरेदी खुल्या बाजारातील किमतीनुसारच करावी लागते. त्यानुसार आता सामान्यांना विनाअनुदानित सिलिंडरसाठी २२० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. दरवाढ करण्याची ही एका महिन्यातील तिसरी वेळ आहे. याआधी १ डिसेंबरला ६३ तर ११ डिसेंबरला साडेतीन रुपयांनी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.