नवी दिल्ली : युक्रेन संघर्षांचे परिणाम म्हणून ऊर्जा, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठय़ा प्रमाणावर वाढल्या असून, विकसनशील देशांचा विचार करून त्या कमी केल्या जाव्यात, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी ब्रिक्स गटाच्या आभासी बैठकीत सांगितले.

 ‘ब्रिक्स’ने नेहमीच सार्वभौम समानता, प्रादेशिक अखंडता आणि आंतरराष्ट्रीय कायदा यांच्याबद्दल आदर दाखवला असून, ही बांधीलकी या गटाने नेहमीच जपायला हवी, असे ब्राझील, रशिया, चीन व दक्षिण आफ्रिका या इतर देशांचे परराष्ट्रमंत्रीही सहभागी झालेल्या बैठकीत बोलताना जयशंकर म्हणाले.  या गटाने दहशतवाद, विशेषत: सीमेपलीकडून होणारा दहशतवाद अजिबात खपवून घेऊ नये, असे ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत पाकिस्तानचा नामोल्लेख न करता जयशंकर यांनी सांगितले.  ‘आज ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झालो व त्यात काही महत्त्वाच्या मुद्दय़ांचा उल्लेख केला. आपण करोना साथीमुळे उद्भवलेल्या सामाजिक- आर्थिक संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू नये, तर लवचिक आणि विश्वासार्ह पुरवठा साखळय़ा निर्माण करायला हव्यात.