Premium

लोकसभेच्या तयारीला लागा! भाजप खासदारांना पंतप्रधानांचा सल्ला

विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत, पाच महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांना दिला.

Prime Minister advises BJP MPs to start preparations for Lok Sabha
लोकसभेच्या तयारीला लागा! भाजप खासदारांना पंतप्रधानांचा सल्ला

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत, पाच महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांना दिला. मध्य प्रदेश, राजस्थान व  छत्तीसगडमधील भाजपच्या यशाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसद अधिवेशनाच्या काळात दर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक होते. मात्र हिवाळी अधिवेशनात मोदींच्या कार्यबाहुल्यामुळे ही बैठक गुरुवारी झाली. विधानसभा निवडणुकीतील यशाचे मानकरी ठरलेल्या पंतप्रधान मोदींचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते. बैठकीसाठी मोदींचे आगमन होताच पक्षाच्या तमाम खासदारांनी त्यांचा नावाचा जयघोष केला व तिसरी बार मोदी सरकारह्ण अशा घोषणा दिल्या. नड्डा यांनी उत्तरेकडील तीनही राज्यांतील भाजपच्या यशाचा आढावा घेतला. त्यानंतर मोदींनी विधानसभा निवडणुकांचे विश्लेषण केले. निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला जनमताच्या नाराजीचा फटका सहन करावा लागतो. मात्र, कल्याणकारी योजना आणि सुशासन या दोन्हींमुळे भाजप सरकारांविरोधात जनमताची नाराजी निर्माण झाली नाही व भाजपला मतदारांनी मध्य प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापनेची संधी मिळवून दिली, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>Gaganyaan ते NISAR; भारत पुन्हा एकदा अवकाश कवेत घेणार! ISRO ने २०२५ पर्यंत १२ मोहिमा आखल्या

येत्या पाच महिन्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होत असून राम मंदिरसारख्या मुद्दय़ावर भाजपचा फारसा भर नसेल. त्याऐवजी केंद्र व भाजपची सत्ता असलेल्या राज्य सरकारांच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार व प्रसारावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. सरकारांच्या योजना अधिकाधिक लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्लाही मोदींनी पक्षाच्या खासदारांना दिला. सरकारच्या योजनांच्या विस्तारासाठी भाजपने १५ नोव्हेंबरपासून विकास भारत संकल्प यात्रा सुरू केली असून त्यामध्ये सर्व खासदारांनी सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. ही यात्रा २५ जानेवारीपर्यंत चालू राहणार असून प्रामुख्याने आदिवासी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपच्या कार्यक्रमांचा सर्व भर योजनांवर असेल, असे सूत्रांनी सांगितले.

भाजपला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळण्याचे प्रमाण ५७ टक्के असून काँग्रेस व प्रादेशिक पक्षांसाठी ते अनुक्रमे ते २० टक्के व ४९ टक्के आहे. भाजपला तीनवेळा सत्ता मिळण्याचे प्रमाण ५९ टक्के असून काँग्रेसला एकदाही सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करता आलेली नाही. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘मोदीजी नको, मोदी म्हणा’

या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले यश कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ‘मी पक्षाचा कार्यकर्ता असून माझ्यासाठी आदरणीय वगैरे विशेषणांचा वापर करू नका. प्रचार करताना मोदी जी की गॅरेंटी असे न म्हणता मोदी की गॅरेंटी असेच म्हणा,’ असा सल्ला पंतप्रधानांनी नेते-कार्यकर्त्यांना दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prime minister advises bjp mps to start preparations for lok sabha amy

First published on: 08-12-2023 at 03:43 IST
Next Story
Gaganyaan ते NISAR; भारत पुन्हा एकदा अवकाश कवेत घेणार! ISRO ने २०२५ पर्यंत १२ मोहिमा आखल्या