रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थ मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी आणि अप्रत्यक्षपणे केंद्रीय अर्थमंत्र्यांवर भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी गेल्या काही दिवसांपासून टीका करीत असून त्याबाबत आतापर्यंत मौन पाळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉ. स्वामी यांच्या वक्तव्याबद्दल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तीव्र नाराजी व्यक्त केली.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हेही देशभक्त आहेत, असे स्पष्ट करून मोदी म्हणाले की, जर कोणी स्वत:ला यंत्रणेपेक्षा मोठे समजत असेल तर ते अयोग्य आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुषंगाने मोदी यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपनेही डॉ. स्वामी यांच्या मताशी असहमती दर्शविली आहे. रघुराम राजन यांच्यासह मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन आणि आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकान्त दास यांच्यावर डॉ. स्वामी यांनी जोरदार हल्ला चढविला होता.

जेटली यांचा नामोल्लेख न करता डॉ. स्वामी यांनी त्यांच्यावरही हल्ला केला होता. मात्र मोदी यांनी सोमवारी डॉ. स्वामी यांच्या हल्ल्याचा जोरदार समाचार घेतला. अशा प्रकारचे वक्तव्य करणे सर्वस्वी अयोग्य असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले. सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी केलेल्या कृतीमुळे देशाचे कधीही भले होणार नाही. जनतेने जबाबदारीने वागले पाहिजे, कोणी स्वत:ला यंत्रणेपेक्षा मोठा समजत असल्यास ते चुकीचे आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

रघुराम राजन यांची स्तुती

डॉ. स्वामी यांचा नामोल्लेख न करता मोदी यांना भाजपच्या राज्यसभेतील खासदारांनी रघुराम राजन यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता मोदी यांनी वरील बाब स्पष्ट केली. मात्र त्यानंतरही एका ज्येष्ठ अधिकाऱ्यावर टीका करण्यात आली. मोदी यांनी अलीकडेच अलाहाबाद येथे झालेल्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना वक्तव्य आणि वर्तणूक यांचे संतुलन राखण्याचा सल्ला दिला होता. हा आपला संदेश स्पष्ट आहे का, असे विचारले असता मोदी म्हणाले, आपल्या मनांत कोणताही संभ्रम नाही, आपला आदेश सुस्पष्ट आहे. त्यानंतर मोदी यांनी राजन यांची स्तुती केली, ते देशभक्त असल्याची पावतीही मोदी यांनी दिली, ते कोणत्याही पदावर नसले तरीही ते यापुढेही देशाची सेवा करतील, याची आपल्याला खात्री असल्याचेही मोदी म्हणाले.