पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते संयुक्त राष्ट्रांची महासभा म्हणजेच युएनजीएच्या ७६ व्या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच ते जगभरातील नेत्यांसोबत बैठक करणार आहे. या बैठकीसाठी जगभरातील १०० देशांचे प्रमुख नेते अमेरिकेला जाणार आहे. यात पंतप्रधान मोदींबरोबरच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचाही समावेश आहे.

पंतप्रधान मोदी २५ सप्टेंबरच्या एका चर्चासत्रादरम्यान मोदी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधितही करणार आहेत. यापूर्वी एक दिवस आधी म्हणजे २४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. ही द्विपक्षीय भेट असणार आहे. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. व्हाइट हाऊसने राष्ट्राध्यक्षांच्या आठवडाभराच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना बायडेन हे २४ सप्टेंबर रोजीच जपानी पंतप्रधान सुगा योशीहिदे यांचीही भेट घेणार आहे. बायडेन व्हाइट हाऊसमध्ये आल्यानंतर मोदी, सुगा आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची पहिल्यांदाच प्रत्यक्षात भेट घेणार आहेत. क्वाड देशांच्या नेत्यांना पहिल्यांदाच बायडेन हे राष्ट्राध्यक्ष म्हणून भेटणार आहेत.

मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करण्यासाठी बायडेन हे सोमवारी दुपारी न्यूयॉर्कला रवाना होणार आहेत. न्यूयॉर्कमधील कार्यक्रमामध्येच बायडेन हे मॉरिसन यांची भेट घेणार आहेत. न्यूयॉर्कवरुन परतल्यानंतर बायडेन हे मंगळवारी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. २४ सप्टेंबर रोजी मोदी बायडेन यांची तर २३ सप्टेंबर रोजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत.

सर्व देशांना करोना लसींचा पुरवठा केला जाण्यासंदर्भातील मुद्दा हा चर्चेच्या मुख्य मुद्द्यांपैकी एक असेल. आरोग्य तज्ज्ञांनी अनेकदा इशारा देऊनही जगभरामधील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करोना लसीकरण झालं नसल्याने करोनाविरुद्धच्या जागतिक लढाईला बळ मिळालेलं नाही. लसीकरणाशिवाय करोनाविरुद्ध लढता येणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं श्रीमंत देशांना लसींचा पुरवठा करण्यापासून बूस्टर शॉर्ट्स देण्यास सुरुवात केल्यामुळे नाराजी व्यक्त केलीय. जगातील गरीब देशांना अजून लसी मिळाल्या नसताना अशाप्रकारे लसींच्या पुरवठ्याची असमानता चिंताजनक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

पुढील बुधवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष इतर देशांच्या नेत्यांसोबत करोनाच्या पार्श्वभूमीवर एक व्हर्ल्चूअल बैठक घेणार आहेत. युएनजीसीच्या बैठकीनंतर ही बैठक पार पडणार आहे.