पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाले आहे, त्यामुळे इंधनाची बचत करणे आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा असं आवाहन, काय म्हणाले मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी केला पाहिजे. शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. पंतप्रधान हैदराबादमध्ये म्हणाले की, आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे या जागतिक संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. ते म्हणाले की, ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तिथे लोकांनी तिचा वापर करावा. आज आपल्याला बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज आहे. एकूण सात आवाहनं केल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह इतर अनेकजण मोदींवर टीका करत आहेत.

मोदींच्या आवाहनात ७ मुद्यांचा समावेश

१. शक्य तिथे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
२. वर्षभरासाठी सोने खरेदी टाळा
३. सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करून पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा
४. स्वयंपाक बनवण्याच्या तेलाचा वापर कमी करा
५. रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळा
६. स्वदेशीचा अधिकाधिक वापर करा, विदेशी उत्पादनं टाळा
७. वर्षभरासाठी विदेशी प्रवास टाळा

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर टीका करताना हे सरकारचं अपयश असल्याचं नमूद केलं आहे. “मोदीजींनी काल जनतेकडून त्याग करण्याची मागणी केली. सोनं खरेदी करू नका, विदेशात जाऊ नका, पेट्रोल कमी वापरा, खाद्यतेल कमी वापरा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम करा. हे उपदेश नाहीत, त्यांच्या अपयशाचे पुरावे आहेत. १२ वर्षांत त्यांनी या देशाला अशा टप्प्यावर आणून ठेवलंय की त्यांना जनतेला सांगावं लागतंय काय खरेदी करा, काय करू नका, कुठे जा, कुठे जाऊ नका. प्रत्येकवेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी सगळी जबाबदारी जनतेवर टाकून मोकळे होतात. हा देश चालवणं आता तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही” अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

rahul gandhi
राहुल गांधी (लोकसत्ता टिम)

महाराष्ट्र काँग्रेसने पोस्ट करत काय टीका केली?

भाषणात जनतेला “डिझेल-पेट्रोल वाचवा, त्याग करा” म्हणून शहाणपण शिकवलं आणि आज स्वतःच्या रॅलीसाठी हजारो लिटर इंधन फुंकून आणि कोट्यवधींची उधळपट्टी करून मिरवताहेत ? हा कसला ‘त्याग’ आहे ? जनतेने फक्त महागाई सोसायची आणि तुम्ही मात्र सरकारी पैशावर इव्हेंटबाजी करायची ?

सचिन पायलट यांचं म्हणणं काय?

काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की जे काही देशात चाललं आहे आणि जागतिक घडामोडींचा जो काही परिणाम होतो आहे तो आपल्यापासून लपवला जातो आहे का? पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, वर्क फ्रॉम होम करा वगैरे सात मुद्दे मोदी लोकांना सांगत आहेत. त्यांनी संसदेला विश्वासात का घेतलेलं नाही? इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचे नेमके काय परिणाम होत आहेत हे सांगितलं का जात नाही? संसदेतल्या सर्व पक्षीय खासदारांना विश्वासात घेऊन देशावर काय संकट आलंय हे स्पष्ट का केलं जात नाही? असे प्रश्न सचिन पायलट यांनी विचारले आहेत.

सीपीआयचे नेते डी राजा म्हणाले हे तर पंतप्रधानांचं अपयश

जे सात मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडले आहेत आणि जनतेकडून अपेक्षा करत आहेत ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अपयश आहे. कामगार घरून काम कसं करणार हे जरा मोदी स्पष्ट करतील का? असा खोचक सवाल सीपीआयचे नेते डी. राजा यांनी विचारला आहे. तसंच असं आवाहन मोदींना करावं लागणं हे त्यांचं अपयश आहे असंही डी. राजा म्हणाले.

“सात प्रकारची आवाहनं करुन आपल्या देशातलं सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कटू सत्य लपवत आहेत का?”

कार्ती चिदंबरम, नेते काँग्रेस

रामदास आठवले, अश्विनी वैष्णव यांनी केली मोदींच्या निर्णयाची पाठराखण

रामदास आठवले, तसंच मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोदींनी केलेल्या आवाहनची पाठराखण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं आहे ते देशाच्या दृष्टीने योग्यच आहे. त्याचा विचार लोकांनी केला पाहिजे असं या दोघांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाचं समर्थन करताना त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेजारी राष्ट्र पाकिस्तानचं उदाहरण दिलं आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर आपलं मत मांडलं. “सगळ्यांनाच माहिती आहे की जगात अमेरिका-इस्रायल व इराणच्या युद्धामुळे तेल आणि गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये तर याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानात ४५० रुपये लिटर एवढा भाव पेट्रोलचा झाला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले