भारत-पाकिस्तान सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून तणावाची परिस्थती आहे. दोन्ही देशातील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तणावाच्या वातावरणातही  पाकिस्तानचे  पंतप्रधान नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी आज सकाळी ट्विट करून नवाझ शरीफ यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छात त्यांनी शरीफ यांच्या दीर्घायुष्य आणि आरोग्यदायी जीवन राहावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

नवाझ शरीफ आज ६७ वर्षांचे झाले आहेत. गतवर्षी पंतप्रधान मोदी यांनी अचानक लाहोर येथे जाऊन नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचवेळी ते शरीफ यांच्या नातीच्या लग्नातही सहभागी झाले होते. यावरून मोठा वाद झाला होता.
भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून संबंध ताणले गेले आहेत. या वर्षांच्या सुरूवातीलाच पंजाबमधील पठाणकोठ एअरबेसवर हल्ला झाला होता. यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता. त्याचबरोबर यावर्षी पाकिस्तानकडून सीमेवर विक्रमी १००हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक भारतीय जवान शहीद झाले आहेत.