पंतप्रधान मोदी यांची ‘सीओपी-२६’ परिषदेत ग्वाही

भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या ‘सीओपी-२६’ या जागतिक हवामान परिषदेत सोमवारी दिली. भारत आपली गैर-जीवाश्म ऊर्जा क्षमता ५०० गिगावॅटपर्यंत वाढवेल आणि २०३० पर्यंत अक्षय ऊर्जेद्वारे आपली ५० टक्के ऊर्जेची गरज पूर्ण करेल, असा विश्वास मोदी यांनी जागतिक नेत्यांना आश्वस्त करताना व्यक्त केला. 

पुढील पिढीला जागरूक करण्यासाठी हवामान बदलाबाबतच्या धोरणांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याची गरजही मोदी यांनी व्यक्त केली. ‘सीओपी-२६’ परिषदेत सहभागी जागतिक नेत्यांपुढे पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले. ते म्हणाले, आपल्याला परिस्थितीनुसार बदल हा विकास धोरणांचा आणि योजनांचा मुख्य भाग बनवावा लागेल. भारतात, नल से जल, क्लीन इंडिया मिशन आणि उज्ज्वला योजनांनी नागरिकांना फायदा झालाच, परंतु त्यांचे जीवनमानही उंचावले.

हवामान बदलाच्या संकटाला तोंड देताना केवळ त्या संकटाचे निराकरणच नव्हे तर त्याचे रुपांतर करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.  मोदी यांच्या आधी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी भाषण केले. त्यांनी विकसनशील देशांना स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी मदत करण्याची ग्वाही दिली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी परिषदेते उद्घाटन केले आणि त्यांनी पृथ्वीच्या सद्यस्थितीची तुलना बॉण्डपटाच्या कथेशी केली. पृथ्वी विध्वंसाच्या उंबरठ्यावर असताना बॉम्ब निकामी करण्याचा प्रयत्न जेम्स बॉण्ड करतो, तशी आपली अवस्था असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, भारतातील सर्व हरित प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून अतिरिक्त ७५० दशलक्ष पौंडांची मदत मिळावी यासाठी ब्रिटन ‘हरित हमी’ (ग्रीन गॅरेंटी) देईल, अशी घोषणा  ‘सीओपी-२६’ परिषदेत करण्यात आली. ब्रिटनच्या हरित हमीमुळे भारतातील स्वच्छ ऊर्जा, वाहतूक आणि नागरी विकास क्षेत्रात स्वच्छ पायाभूत सुविधांना चालना मिळेल, असे सांगण्यात आले. ब्रिटनच्या हरित औद्योगिक क्रांतीचा जगभर प्रसार व्हावा. स्वच्छ तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमधील पदलाची गती अविश्वसनीय आहे, परंतु आपल्या पृथ्वी वाचवण्याच्या शर्यतीत एकही देश मागे पडू नये, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले.

हवामानबदलाच्या गंभीर जागतिक समस्येबद्दल पुढील पिढीला जागरूक करण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतच्या धोरणांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याची गरज आहे.  – नरेंद्र मोदी,  पंतप्रधान