नवी दिल्ली : करोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचे जगभर भय पसरल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशात सतर्कतेचे आदेश दिले. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याच्या निर्णयाबद्दल फेरविचाराचे निर्देशही त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील करोना परिस्थिती आणि लसीकरणाची सद्य:स्थिती याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या वेळी ‘ओमिक्रॉन’चा उद्रेक आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्याच्या फैलावाबद्दल दिलेल्या इशाऱ्याची माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. पंतप्रधानांनी नव्या विषाणूच्या उद्रेकाबद्दल चिंता व्यक्त केली आणि रुग्ण आढळलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले, असे पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.  

भारतीय हवाई वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारीच आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक येत्या १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचे जाहीर केले होते. परंतु दक्षिण ऑफ्रिकेत ‘ओमिक्रॉन’चे रुग्ण आढळल्याने जगभर चिंता व्यक्त केली जात आहे. बेल्जियम, जर्मनी, इस्रायलपाठोपाठ ब्रिटनमध्येही नव्या विषाणूचे रुग्ण आढळल्याने युरोपीय देशांनी शुक्रवारीच विमान वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक १५ डिसेंबरपासून सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सूचना हवाई वाहतूक मंत्रालयाला केली.

सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत, नव्या विषाणूमुळे भारतावर होणाऱ्या परिणामांचीही चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी ‘ओमिक्रॉन’च्या धोक्याबद्दल लोकांना अधिक सावध राहण्याचे, मुखपट्टी वापरण्याचे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले, असे पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

जनुकीय क्रमनिर्धारण

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे नमुने घेऊन त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या करण्याचे निर्देशही पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पंतप्रधानांचे निर्देश

– आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा.

– परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित करा, त्यांच्या चाचण्या करा.

– ओमिक्रॉनचे रुग्ण आढळलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांबाबत अधिक सतर्क राहा.

जगभरात काय?

हेग : ‘ओमिक्रॉन’च्या भयामुळे अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकी देशांतील प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या नव्या विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिल्यानंतर युरोपीय महासंघातील देश, ब्रिटनसह ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, इराण, जपान, थायलंड आणि अमेरिकेनेही दक्षिण आफ्रिकी देशांतून होणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंधने घातली आहेत. बेल्जियम, इस्रायल, जर्मनी, हाँगकाँग आणि ब्रिटनमध्येही ‘ओमिक्रॉन’चे रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून जर्मनीत दाखल झालेल्या दोन विमानांतील ६१ प्रवासी बाधित आढळले आहेत.

राज्यांशी समन्वय

देशातील राज्य सरकारांशी समन्वय साधून तेथील पायाभूत वैद्यकीय सुविधा, ऑक्सिजन निर्मिती-पुरवठा, श्वसनयंत्रांची उपलब्धता, अतिरिक्त औषधसाठा इत्यादीचा आढावा घेण्याचे आदेशही पंतप्रधानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

राज्यात कठोर नियमावली

* सर्वत्र मुखपट्टी परिधान करणे आवश्यकच, मुखपट्टीशिवाय कोठेही फिरता येणार नाही, रुमालाला परवानगी नाही, तोंडाला रुमाल गुंडाळल्यास ५०० रुपये दंड.

* उपनगरीय रेल्वे, बेस्ट बस, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस, मेट्रो, मोनो रेलसह स्थानिक परिवहन सेवांच्या बसमध्ये लसीकरण झालेल्यांनाच मुखपट्टीसह प्रवेश.

* खासगी बस, गाडय़ा, टॅक्सी, रिक्षा, ओला-उबरमध्ये लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश.  नियमांचे उल्लंघन केल्यास चालक व प्रवाशास ५०० तर वाहनमालकास १० हजार रुपये दंड.

* दुकाने, मॉल, कार्यालयात येणाऱ्यांनी मुखपट्टीचा वापर केला नसल्यास असे दुकानदार किंवा आस्थापनांना १० हजार रुपये दंड. संबंधित दुकान, मॉल, कार्यालयाला टाळे.

* कार्यक्रम, समारंभ, संमेलन, नाटय़प्रयोग, क्रीडा सामने, दुकाने, मॉल, कार्यालयांत केवळ लसीकरण झालेल्यांनाच मुखपट्टीसह प्रवेश. प्रवेशासाठी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक.

* १८ वर्षांखालील मुलांना महाविद्यालयीन किंवा अन्य ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणास्तव लस न घेतलेल्यांसाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक.  

* बंद सभागृहात ५० टक्के, तर खुल्या मैदानात २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी.

* चित्रपटगृहे, नाटय़गृहे, मंगल कार्यालयांत क्षमतेच्या ५० टक्के लोकांना प्रवेश.

* संस्था, कंपनीच्या कार्यालयाने नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड. संस्था बंदचीही कारवाई.

ओमिक्रॉनचे रुग्ण आढळत असल्याने आपल्याला अधिक सतर्क राहावे लागेल. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लशीच्या दुसऱ्या मात्रेचे लक्ष्य गाठण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. – नरेंद्र मोदी</strong>, पंतप्रधान   

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi new covid variant omicron scare zws
First published on: 28-11-2021 at 03:49 IST