नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष आणि सामान्य जनता यांच्यात विश्वासाचा दुवा म्हणून काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधानांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सामान्य जनतेचा पाठिंबा भाजपला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

भाजप हा एका कुटुंबाभोवती चालणारा पक्ष नाही, तर तो सेवा, संकल्प आणि समर्पण या मूल्यांवर वाटचाल करतो, असे पंतप्रधानांनी भाषणात नमूद केल्याचे पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले. बैठकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर तसेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत सादरीकरण केले. पंजाब प्रदेश शाखेनेदेखील निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत माहिती दिल्याचे यादव यांनी नमूद केले.

जनतेला भेडसावणाऱ्या मुद्दय़ांचा भाजपने नेहमीच विचार केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष आणि जनता यांच्यात विश्वासाचा सेतू म्हणून काम करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. करोनाकाळातही पक्ष कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा करण्यावर भर दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भाषणानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ठराव मांडला, त्यात मोदी सरकारच्या विविध उपाययोजनांबद्दल कौतुक करण्यात आले. त्याबाबतच्या ठरावाची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. करोनाकाळात जनतेत विनाकारण भीती निर्माण करण्याच्या विरोधकांच्या संधिसाधू राजकारणाचा ठरावात निषेध करण्यात आल्याचे सीतारामन यांनी नमूद केले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसेच मुरली मनोहर जोशी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

पक्षविस्ताराचे उद्दिष्ट

भाजपने संघटना विस्ताराचे उद्दिष्ट ठेवताना २५ डिसेंबरपर्यंत देशातील सर्व दहा लाख ४० हजार मतदान केंद्रनिहाय पक्ष समित्या नेमण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच ज्या राज्यांमध्ये पक्षाचा विशेष विस्तार झालेला नाही अशा केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच तेलंगणमध्ये विस्ताराचे ध्येय असल्याचे पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नमूद केले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव झाला असला, तरी राज्यात मोठी झेप घेतल्याचे त्यांनी नमूद केले. लोकशाही पद्धतीने पक्ष राज्यात संघर्ष करेल, असे केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले.