पीटीआय, बंदर सेरी बेगवान
भारत आणि ब्रुनेईदरम्यानचे संबंध बळकट करण्याचा आपल्याला विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. त्यांचा दोन देशांचा तीन दिवसीय दौरा मंगळवारी सुरू झाला. पहिल्या टप्प्यात ते ब्रुनेईमध्ये दाखल झाले. दोन्ही देशांदरम्यान विशेषत: व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बंदर सेरी बेगवान येथे आगमन झाल्यावर सांगितले.
भारत आणि ब्रुनेईदरम्यान ४० वर्षांपूर्वी राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले असून त्या देशाला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. ब्रुनेईचे युवराज अल-मुहतादी बिल्ला यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांना विशेष सलामी देण्यात आली. आपण सुलतान हसनल बोलकिया आणि राजघराण्यातील इतर व्यक्तींची भेट घेण्यास उत्सुक असल्याचे मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा >>>विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
भारताच्या ‘पूर्वेकडे पाहा’ या धोरणामध्ये ब्रुनेई हा महत्त्वाचा भागीदार आहे. त्याशिवाय हिंद-प्रशांत महासागर प्रदेशातील सामरिक घडामोडींच्या दृष्टीने ब्रुनेई हा महत्त्वाचा देश आहे. दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून ते परस्परांविषयी आदरावर अवलंबून आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या उच्चायुक्तालयाच्या विधि कक्षाचे उद्घाटन केले.
मोदी हॉटेलवर पोहोचल्यानंतर ब्रुनेईमधील भारतीय समुदायाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये लहान मुलांचाही लक्षणीय समावेश होता. मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला. बुधवारी ते सुलतान हसनल बोलकिया यांची भेट घेणार आहेत. ब्रुनेईचा दौरा आटोपल्यानंतर ते बुधवारीच सिंगापूरला रवाना होणार आहेत.