अहमदाबाद : जगात ९/११ सारख्या दहशतवादाच्या घटनांवर भारताने अंगीकारलेली मानवी मूल्ये हेच चिरंतन असे उत्तर आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

सरदारभवन कॉम्प्लेक्स या अहमदाबाद येथील संस्थेच्या उद्घाटनानंतर दृकश्राव्य माध्यमातून बोलताना त्यांनी सांगितले की,  ११ सप्टेंबर याच दिवशी अमेरिकेत मानवतेवर हल्ला झाला होता. जगाला त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ११ सप्टेंबर १८९३ रोजी जेव्हा जागतिक धर्मपरिषद झाली होती त्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी जागतिक मंचावर येऊन जगाला भारताच्या मानवी मूल्यांची ओळख करून दिली होती. भारताची मानवतावादाची तत्त्वेच आज जगाला मार्गदर्शक ठरत आहेत.

त्यामुळे आपण यापुढेही मानवतावादी मूल्यांवर श्रद्धा ठेवली पाहिजे.

तमिळ कवी सुब्रमणिया भारती यांच्या तमिळ अभ्यासाला वाहिलेल्या अध्यासनाची स्थापना करण्याची घोषणा मोदी यांनी केली. हे अध्यासन बनारस हिंदू विद्यापीठाच्या कला शाखेत स्थापन केले जाणार आहे. ते म्हणाले की, सुब्रमणिया भारती हे स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञ व महान विद्वान होते. सरदार पटेल यांनी ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’चा नारा दिला. महाकवी  भारती यांच्या तत्त्वज्ञानातून आपल्याला या दिव्यत्वाची अनुभूती येते.