गोरखपूर (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाच्या लाल टोपीचा उल्लेख धोकायदाक असा केला. या लाल टोपीचा संबंध लाल दिव्याच्या वाहनाशी जोडत या पक्षाचे नेते सत्तेसाठी हपापलेले आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधानांनी केला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या गोरखपूर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यानंतर सभेत पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला लक्ष्य केले. लाल टोपी कोणाची आहे? हे उत्तर प्रदेशातील नागरिकांना माहीत आहे असा उल्लेख पंतप्रधानांनी करत, या पक्षाच्या व्यक्ती घोटाळे करतात, जमीन हडप करतात इतकेच काय दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवितात, असा आरोप पंतप्रधानांनी केला. पूर्व उत्तर प्रदेशातील ही सभा भाजपसाठी महत्त्वूर्ण होती. या भागात राज्यातील विधानसभेच्या ४०३ पैकी १६० जागा आहेत. देशात २०१४ पूर्वी देशात युरिया आयात करावा लागत होता. मात्र, आता परिस्थिती बदलल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 

दरम्यान, पंतप्रधानांच्या  या टीकेला समाजवादी पक्षाने प्रत्युत्तर दिले आहे. लाल टोपी ही भाजपसाठी धोक्याची घंटा असून, सत्तेतून त्यांना पायउतार करणार आहोत असा टोला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लगावला आहे.