किरकोळ व घाऊक व्यापाराला मध्यम व लघु उद्योगांचा दर्जा देण्याचा निर्णय महत्त्वाचा असून त्यामुळे व्यापाऱ्यांना या अग्रक्रमाच्या क्षेत्राचे लाभ मिळू शकतील. आमचे सरकार व्यापाऱ्यांचे सक्षमीकरण करण्यास वचनबद्ध आहे, असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी किरकोळ व घाऊक विक्री क्षेत्रास लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग क्षेत्रात समाविष्ट करण्याची घोषणा केली होती, त्यामुळे व्यापाऱ्यांना आता रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अग्रक्रमाने कर्ज मिळू शकणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी या निर्णयावर केलेल्या ट्वीट  संदेशात म्हटले आहे, की किरकोळ व घाऊक विक्री क्षेत्रास लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात समाविष्ट करण्याचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. यातून कोट्यवधी व्यापारी बांधवांचा फायदा होणार आहे. त्यांना वित्त पुरवठा व इतर मदतीत फायदे होतील व त्यांचा उद्योग वाढण्यास मदत मिळेल. व्यापाऱ्यांना आम्ही सक्षम करणार आहोत.

अधिकृत सूत्रांनी  सांगितले, की या निर्णयाचा लगेचच परिणाम होणार असून लघु किरकोळ व्यापारी व घाऊक दुकानदार यांची उलाढाल २५० कोटींपर्यंत जाऊ शकते. आत्मनिर्भर भारत योजनेत विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत.