नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात २४ सप्टेंबरला वॉशिंग्टनमध्ये प्रथमच द्विपक्षीय बैठक होत असून  त्यात व्यापार, गुंतवणूक, संरक्षण व सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले. 

मोेदी हे बुधवारी अमेरिकेला रवाना होत असून ते रविवारी परतणार आहेत. मोदी-बायडेन भेटीत  मूलतत्त्ववाद तसेच दहशतवादाचा मुकाबला यासह प्रादेशिक प्रश्नांवर चर्चा होणार आहे. अफगाणिस्तानातील घडामोडीही या बैठकीत चर्चेचा विषय ठरतील. अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही मोदी यांची चर्चा होणार आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन यांच्या सुरक्षा भागीदारीचा क्वाड गटावर काय परिणाम होईल असे विचारले असता त्यांनी सांगितले की, दोन्ही गटांचे स्वरूप वेगळे आहे त्यामुळे त्याचा तसा अर्थ काढता येणार नाही.

 मोदी यांनी यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये अमेरिकेला भेट दिली होती त्यावेळी हाऊडी मोदी कार्यक्रम ह्यूस्टन येथे झाला होता. मार्चमध्ये क्वाड नेत्यांची पहिली शिखर बैठक आभासी पातळीवर झाली होती त्यावेळी बायडेन व मोदी उपस्थित होते पण ती प्रत्यक्ष भेट नव्हती. दोन्ही नेते सायबर सुरक्षा, आपत्ती निवारण, हवामान बदल, शिक्षण, सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधा, नवीन तंत्रज्ञान या विषयांवरही चर्चा करणार आहेत. हिंद प्रशांत क्षेत्रातील स्थितीवरही चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी हे वॉशिंग्टनमधील कार्यक्रम आटोपून २५ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत उपस्थित राहणार आहेत. आमसभेच्या ७६ व्या अधिवेशनात २५ सप्टेंबरला त्यांचे न्यूयॉर्क येथे आमसभेत भाषण होईल.