पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या शुक्रवारच्या ‘यास’ वादळ आढावा बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अनुपस्थित राहिल्याने पश्चिाम बंगाल सरकार आणि  केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील संघर्ष शनिवारी पुन्हा उफाळून आला.

आपला अपमान झाल्याचे नमूद करत वादळ आढावा बैठक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये होणार होती, परंतु या बैठकीला भाजपचे नेते आणि राज्यपालांना का निमंत्रित करण्यात आले, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. ममता यांचा रोख भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीट केलेल्या छायाचित्रावर होता. हे छायाचित्र पंतप्रधान मोदी, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार आणि अन्य केंद्रीय मंत्री ममता यांची प्रतीक्षा करीत असल्याचे होते.

दरम्यान, पंतप्रधानांच्या बैठकीला अनुपस्थित राहून ममता बॅनर्जी आणि राज्याचे मुख्य सचिवांनी पंतप्रधानांचा अपमान केला आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधानांचा अपमान केला, त्यावर टीका करण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत’, असे अधिकारी यांनी दूरचित्रसंवाद माध्यमाद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पंतप्रधानांच्या कार्यालयाने जे ट्वीट केले त्यामुळे आपली प्रतिमा मलिन झाली, आपला अपमान झाला असा आरोप ममता यांनी केला. आम्ही जेव्हा बैठकीच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा बैठक सुरू झाली होती, त्यांनी आम्हाला बसण्यास सांगितले, तेव्हा अहवाल सादर करू द्यावा अशी विनंती आपण केली. तेव्हा आपल्याला बैठक एक तासानंतर होणार असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यातच बैठक होणार असल्याचेही सांगण्यात आले असतानाही तेथे भाजपचे नेते का हजर होते, असा सवाल ममतांनी केला.

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी शनिवारी कोलकात्यात केला. राज्याचे मुख्य सचिव अलपन बंदोपाध्याय यांना केंद्रात बोलाविण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा आणि त्यांना करोना संकटात राज्यातील जनतेसाठी काम करण्याची परवानगी द्यावी, असे आवाहनही ममतांनी केले.

पश्चिम बंगालमध्ये अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला त्यातून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अद्यापही सावरलेले नाहीत त्यामुळे ते पावलोपावली आपल्या सरकारपुढे अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही ममता यांनी केला.

 

…तर मोदींचे पाय धरण्याचीही तयारी!

पश्चिम बंगालच्या विकासासाठी आपल्याला जर कोणी मोदी यांचे पाय धरण्यास सांगितले तर त्यासाठीही आपण तयार आहोत, असे ममता म्हणाल्या. मोदी आणि शहा यांना राज्यातील पराभव पचविता आलेला नाही त्यामुळे ते पहिल्या दिवसापासूनच माझ्या सरकारपुढे अडचणी निर्माण करीत आहेत, असा आरोप करून ममतांनी मुख्य सचिवांचा काय दोष आहे, असा सवाल केला. राज्याच्या मुख्य सचिवांना केंद्रात बोलाविण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे त्या म्हणाल्या.

 

ममतांकडून पंतप्रधानांचा  अपमान : अधिकारी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधानांचा अपमान केला, त्यावर टीका करण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत. आपल्याला विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि वादळग्रस्त नंदीग्रामचे आमदार म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अशा वागणुकीतून ममता यांचा उद्धटपणा आणि क्षुद्र राजकारण निदर्शनास येते, अशी टीका भाजपचे नेते शुवेंदू अधिकारी यांनी केली.