जी-२० परिषद आणि COP26 हवामान परिषद या दौऱ्यावरुन परत आल्यावर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील लसीकरणाचा आढावा घेणार आहे. झारखंड, मणीपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय अशा राज्यातील एकूण ४० जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग हा कमी आहे. तेव्हा या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मोदी चर्चा करणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये ५० टक्के नागरीकांना लशीचा अजुन पहिला डोस देखील मिळालेला नाही, तसंच दोन लशीचा डोस मिळालेल्यांचे प्रमाणही खूपच कमी आहे. 

देशात आत्तापर्यंत १०६ कोटींपेक्षा जास्त नागरीकांना लस देण्यात आली आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांत लसीकरणाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे, अनेकांनी लसीचा दुसऱ्या डोस घेण्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. अनेक राज्यात शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आल्या असून चित्रपटगृह देखील पुर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहेत. सध्या करोना बाधित रुग्णांचा आकडाही ११ हजार च्या खाली आला आहे, फेब्रुवारीनंतरचा हा सर्वात कमी करोना बाधित रुग्णांच्या नोंदीचा दैनंदिन आकडा आहे. देशात आता सर्व व्यवस्था पूर्णपणे खुल्या करण्यात आल्या आहेत. असं असतांना दिवाळीनंतर करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. तेव्हा वेगाने लसीकरण करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. म्हणूनच लसीकरणाचा वेग कमी असलेल्या भागांचा मोदी आढावा घेणार आहेत.