केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लोकसभेतही निवेदन केले. नेत्यांनी मर्यादेत राहूनच वक्तव्य केले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्या चार दिवसांपासून संसदेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचे कामकाज सातत्याने तहकूब करावे लागते आहे. तर लोकसभेतही विरोधकांनी घोषणा दिल्याने गोंधळातच कामकाज चालवावे लागते आहे. या पार्श्वभूमी मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत निवेदन सादर करून मंत्र्यांचे वक्तव्य निंदनीय असल्याचे स्पष्ट केले होते. लोकसभेतही विरोधकांनी याप्रकरणी पंतप्रधानांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केल्यामुळे शुक्रवारी प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी निवेदन केले.
ते म्हणाले, मंत्र्यांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी वादग्रस्त शब्दप्रयोग आणि भाषा वापरू नये, असे मी आमच्या पक्षाच्या बैठकीत यापूर्वीच सांगितले आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल मी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांचे वक्तव्य कोणीच मान्य करणार नाही. मात्र, त्या नव्या आहेत आणि त्यांची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन सभागृहाने त्यांच्याबाबतीत उदारपणा दाखवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वादग्रस्त वक्तव्यानंतरही लोकसभा चालू दिल्याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे यावेळी आभारही मानले.