पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही!; नितीशकुमार यांची भूमिका; विरोधकांची एकजूट साधण्याचे प्रयत्न

केंद्रातील सत्तारूढ भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारविरुद्ध विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आपण सकारात्मक भूमिका निभावू,’’ असा निर्धार नितीशकुमार यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही!; नितीशकुमार यांची भूमिका; विरोधकांची एकजूट साधण्याचे प्रयत्न
नितीशकुमार

पीटीआय, पाटणा : ‘‘आपल्याला पंतप्रधानपद मिळवण्याची कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. मात्र, केंद्रातील सत्तारूढ भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारविरुद्ध विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आपण सकारात्मक भूमिका निभावू,’’ असा निर्धार नितीशकुमार यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या सरकारविरुद्ध केंद्र सरकारकडून केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आदी सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोगाचा धाक आपल्याला नसल्याचे स्पष्ट करून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितीशकुमार म्हणाले, की ज्यांना सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोगाची सवय लागली आहे, त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावाच लागेल. बिहारवासीयांना एके दिवशी आपण पंतप्रधानपदी विराजमान झालेले पाहता येईल का, या पत्रकारांच्या प्रश्नावर नितीशकुमार हात जोडून म्हणाले, की कृपया मला असे प्रश्न विचारत जाऊ नका. मला अशी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. मी आपल्या बिहारची सेवा करू इच्छितो.

विखुरलेल्या विरोधी पक्षांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी आपण भूमिका निभावणार का, या प्रश्नावर मात्र नितीशकुमार यांनी सांगितले, की माझी याबाबतची भूमिका सकारात्मक असेल. मला अनेक दूरध्वनी येत आहेत व ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्रातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध (एनडीए) सर्व विरोधी पक्ष एकत्र यावेत, ही माझीही इच्छा आहे. भविष्यात या दिशेने आपली पावले पडताना दिसतील.

 ‘केंद्रीय यंत्रणांची धास्ती नाही’

नव्या सरकारवर ‘ईडी’ व ‘सीबीआय’ची वक्रदृष्टी पडण्याची भीती असल्याबद्दल विचारले गेल्यानंतर नितीशकुमार म्हणाले, की मला त्याचा कोणताही धाक वाटत नाही. एक लक्षात ठेवा, त्यांना (केंद्रातील सत्ताधाऱ्यांना) सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करण्याची सवय जरी लागली असली तरी त्यांच्यावर जनतेची तीक्ष्ण नजर असेल. या वर्षांखेरीस गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आपण जाणार का, या प्रश्नावर नितीशकुमार यांनी सांगितले, की यासंदर्भात आपल्याला वेळ आल्यावर समजेलच.

बिहारमध्ये काँग्रेस आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा

पाटणा : बिहारमध्ये सत्तेपासून दीर्घकाळ दूर असलेल्या काँग्रेसमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेमुळे नवी आशा निर्माण झाली असून, त्यांच्या आमदारांच्या मंत्रिपदासाठीच्या महत्त्वाकांक्षा प्रकट होऊ लागल्या आहेत. खगरिया सदर मतदारसंघाचे आमदार छत्रपती यादव यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, की नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळात मला माझ्या जातीच्या निकषावर स्थान मिळावे.

यादव यांनी म्हटले, की मी सोनिया आणि राहुल गांधी यांना लिहून त्यांच्याकडे औपचारिक लेखी मागणी केली आहे, की मंत्रिपदासाठी माझ्या नावाचा विचार केला जावा. मंत्रिमंडळातील माझ्या समावेशामुळे इतर मागासवर्गीय विशेषत: यादव समाजामध्ये योग्य संदेश जाईल. बिहारमधील यादव समाजाचा काँग्रेसचा मी एकमेव आमदार आहे. माझे दिवंगत वडील राजेंद्र प्रसाद यादव यांनी बिंदेश्वरी दुबे, भागवत झा आझाद आणि जगन्नाथ मिश्रांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवले होते.

बिहारमधील सत्तारूढ महाआघाडी सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६ आमदार असलेल्या डाव्या पक्षांनी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने १९ आमदार असलेल्या काँग्रेसला चार मंत्रिपदे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, बिहारचे प्रदेशाध्यक्ष मदनमोहन झा यांनी स्पष्ट केले, की  या संदर्भात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत.

नितीशकुमार यांच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. विद्यमान मंत्रिमंडळात फक्त मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जगन्नाथ मंदिराचे रत्नभांडार उघडण्याचे प्रयत्न; पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे मंदिर प्रशासनाला पत्र
फोटो गॅलरी