ब्रिटीश राजघराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांना कन्यारत्न झालं आहे. मेगननं मुलीला जन्म दिला आहे. या मुलीचं नाव लिलिबेट डायना ठेवलं आहे. प्रिंस हॅरी यंच्या दिवंगत आईवरून हे नाव ठेवण्यात आलं आहे. या मुलीचा जन्म शुक्रवारी ४ जून रोजी झाला आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या घरी दुसऱ्या मुलाचं आगमन झालं आहे. ब्रिटीश राजघरण्यातील या पिढीतील आठवं बाळ आहे. मेगननं कॅलिफॉर्नियातील सँटा बारबरा कॉटेज रुग्णालयात मुलीला जन्म दिला. आई आणि मुलीची तब्येत ठणठणीत आहे. मुलीचं वजन ३ किलो २२५ ग्रॅम इतकं आहे. यावेळी प्रिन्स हॅरी रुग्णालयात उपस्थित होते. मुलीचा फोटो अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. ६ मे २०१९ रोजी मेगन मर्केलने एका मुलाला जन्म दिला होता. त्याचं नाव आर्ची ठेवण्यात आलं आहे.

१९ मे २०१८ रोजी प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांचा शाही विवाह झाला होता. २०१९ साली या जोडप्याला पुत्ररत्न झालं. त्याच्या पुढच्या वर्षी या जोडप्याने राजघराणं सोडत असल्याचं जाहीर केलं. ९ जानेवारी २०२० रोजी या दोघांनी राजघराणं सोडलं आणि अमेरिकेत वास्तव्यास आले. त्यानंतर एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राजघराण्यावर रंगभेदाचा आरोप केला होता. राजघराणं त्यांच्या मुलगा आर्चीला प्रिन्स बनवू इच्छित नव्हते. कारण त्याच्या जन्मपूर्वी त्यांचा रंग काळा असेल अशी भीती त्यांना होती. आर्चीच्या जन्मापूर्वी राजघराण्यानं प्रिन्स हॅरीसोबत याबाबत चर्चाही केली होती, असं त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितलं होतं. त्याचबरोबर राजघराणं एका तुरुंगासारखं असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता.

Corona: चीनमध्ये ३ वर्षांवरील मुलांचं होणार लसीकरण!; ‘करोनाव्हॅक’ लसीला दिली मंजुरी

२०१६ पासून प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत अनेक चर्चांना ऊत येत होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१७ साली प्रिन्स चार्ल्स यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्या साखरपुड्याची घोषणा केली. त्यानंतर २०१८ साली दोघंही विवाहबंधनात अडकले.