ट्विटर या सोशल मीडिया साइटचा वापर अमेरिकेच्या राजधानीत राजकीय अशांतता घडवण्यासाठी केला जात आहे. यासंदर्भात आपण ६ जानेवारीच्या कॅपिटल दंगलीपूर्वीच ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना इशारा दिला होता, असा दावा ब्रिटनचे प्रिन्स हॅरी यांनी केलाय. हॅरीने मंगळवारी कॅलिफोर्नियामध्ये चुकीच्या माहितीसंदर्भातील ऑनलाइन पॅनेलमध्ये भाग घेतल्यानंतर हा दावा केला. दंगलीच्या आदल्या दिवशी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांना ईमेलद्वारे आपली चिंता कळवल्याचंही हॅरी यांनी सांगितलं.

“जॅक आणि मी ६ जानेवारीच्या आधी एकमेकांना ईमेल करत होतो. त्याचा प्लॅटफॉर्म अमेरिकेत सत्तापालट करण्याची परवानगी देत आहे, अशी चेतावणी मी त्याला दिली होती. तो ईमेल मी घटनेच्या आदल्या दिवशी पाठवला होता आणि नंतर ती घटना घडली. आणि तेव्हापासून त्याने कोणतंही उत्तर दिलेलं नाही,” असं हॅरी RE: WIRED टेक फोरममध्ये म्हणाले.

फेसबुक सारख्या इतर सोशल मीडिया साइट्सवर कोविड आणि हवामान बदलाच्या चुकीच्या माहितीसह कोट्यवधी लोकांची दिशाभूल केल्याचा आरोपही हॅरीने केला. साइटच्या स्वतःच्या धोरणांचे उल्लंघन करूनही करोनाबद्दल चुकीची माहिती पसरवणारे बरेच व्हिडिओ पब्लिश केले गेले आहेत, असे म्हणत त्यांनी YouTubeवर देखील निशाणा साधला. “आणि सर्वात वाईट म्हणजे, ते वापरकर्त्यांकडे YouTube च्या स्वतःच्या अल्गोरिदममधील शिफारसीनुसार आहे. ते थांबवले जाऊ शकते, परंतु ते युजर्सच्या बॉटम लाईनला प्रभावित करते, त्यामुळे त्यांना ते थांबवायचे नव्हते,” असंही ते म्हणाले.