पल्ली : जम्मू-काश्मीरमधील खासगी गुंतवणूक गेल्या सात दशकांपासून १७ हजार कोटी रुपयांवरच होती, परंतु गेल्या दोन वर्षांत मात्र ती ३८ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. खासगी कंपन्या आणि गुंतवणूकदार यांच्याबरोबरच पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. त्यामुळे येत्या २५ वर्षांत या प्रदेशात यशाचा नवा अध्याय लिहिला जाणार असून स्वातंत्र्यानंतरचा तो अमृतकाल असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.  

अनुच्छेद ३७० ऑगस्ट २०१९मध्ये रद्द केल्यानंतर पंतप्रधानांनी प्रथमच जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशला भेट दिली. तेथील सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांत बनिहाल-काझीगुंड रस्त्यावरील बोगदा, दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती मार्ग आणि रतल आणि क्वार जलविद्युत प्रकल्पांचा समावेश आहे.

जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील पल्ली गावात राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त झालेल्या जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले. त्यांचे हे भाषण देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रसारित करण्यात आले. पंचायतराज व्यवस्था ही एक चांगली योजना असून तिचा बोलबाला आहे, लोकांनाही या योजनेबद्दल अभिमान वाटणे गैर नव्हते, पण आमचे सरकार येईपर्यंत जम्मू-काश्मीरमधील नागरिक या योजनेच्या लाभांपासून वंचित होते, असे मोदी म्हणाले.

खासगी कंपन्या आणि गुंतवणूकदार आता जम्मू -काश्मीरमध्ये येत आहेत. पर्यटकांचा ओघ वाढला आहे. गेल्या सात दशकांपासून खासगी गुंतवणूक सुमारे १७ हजार कोटी रुपयांवरच होती, परंतु गेल्या दोन वर्षांत मात्र ती ३८ हजार कोटींवर गेली आहे. असे मोदी म्हणाले. जम्मू-काश्मीर येत्या २५ वर्षांत यशाचा नवा अध्याय लिहिणार असून स्वातंत्र्यानंतरचा तो अमृतकाल असेल असे नमूद करून मोदी यांनी, विकासाच्या या झपाटय़ाने इथल्या तरुणांना नोकऱ्या मिळतील, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांना ज्या मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागले, तसे तुम्हाला लागणार नाही, अशा शब्दांत मोदी यांनी तरुणांना आश्वस्त केले.

अनुच्छेद ३७० लागू असताना अनेक लाभांपासून वंचित राहिलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील लोकांसाठी माझ्या सरकारने तब्बल १७५ केंद्रीय कायदे आणि पंचायत राज प्रणालीही लागू केली, असे मोदी म्हणाले. या कायद्यांनी नागरिकांना अनेक अधिकार बहाल केल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेच्या निवडणुका शांततेत पार पडल्याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला.

वेगवान विकासाचा खेडय़ांना लाभ

जम्मू-काश्मीरमधील पंचायतींना यापूर्वी वितरित केल्या गेलेल्या पाच हजार कोटी रुपयांच्या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने थेट २२ हजार कोटी रुपयांचा निधी पंचायतींना उपलब्ध करून दिल्याचे मोदी यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारची धोरणे आणि योजना वेगाने राबवण्यात येत असून त्याचा लाभ खेडय़ांना होत असल्याचे म्हणाले. 

पल्ली ही देशातील पहिली शून्य कार्बन उत्सर्जन पंचायत असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सांबा जिल्ह्यातील पल्ली येथे ५०० किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मोदी म्हणाले, पल्ली ही देशातील पहिली शून्य कार्बन पंचायत बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पल्लीतील लोकांनी आपण काय करू शकतो, हे दाखवून दिले आहे.

तरुणांना नोकऱ्यांची ग्वाही

गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक विकास प्रकल्प हाती घेतल्यामुळे जम्मू-काश्मीर हे ‘लोकशाही आणि निश्चय’ यांचे एक नवे उदाहरण म्हणून पुढे आले आहे. तुमच्या पूर्वजांना ज्या मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागले, तसे तुम्हाला लागणार नाही. वेगवान विकासामुळे निश्चितच तुम्हाला नोकऱ्या मिळतील, अशा शब्दांत पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरमधील तरुणांना आश्वस्त केले.

मोदी म्हणाले..

* दोन वर्षांत ३८ हजार  कोटींची खासगी गुंतवणूक

* पंचायतींना थेट २२ हजार कोटी रुपयांचा निधी

* अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर विकासाला वेग

* विकासाच्या वेगात तरुणांना नोकऱ्या निश्चित

लोकशाही आणि निर्धार : गेल्या दोन-तीन वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अनेक विकास प्रकल्प राबवण्यात येत असल्याने हा प्रदेश लोकशाही आणि निर्धार यांचे नवे उदाहरण म्हणून पुढे येत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.