Priyanka Bishnoi : शस्त्रक्रिया चुकल्याने प्रियांका बिश्नोई ( Priyanka Bishnoi ) या सरकारी अधिकारी महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रियांका बिश्नोई या राजस्थान प्रशाकयी सेवा अधिकारी आणि त्यानंतर जोधपूरच्या एसीएम म्हणून कार्यरत होत्या. प्रियांका बिश्नोई यांनी त्यांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वी केली होती. ही शस्त्रक्रिया चुकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रियांका बिश्नोई ( Priyanka Bishnoi ) यांनी जोधपूरच्या वसुंधरा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया केली होती. त्यांच्यावर १५ दिवस उपचार सुरु होते. अखेर रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अहमदाबाद येथील सिम्स रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांची प्राणज्योत उपचारांदरम्यान मालवली. शस्त्रक्रिया चुकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होतो आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
नेमकं काय घडलं?
RAS अधिकारी प्रियांका बिश्नोई ( Priyanka Bishnoi ) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता जोधपूरचे जिल्हाधिकारी गौरव अग्रवाल डॉ. एसएन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य आणि खासगी रुग्णालयाच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रियांका बिश्नोई या जोधपूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर उपचार सुरु होते. जोधपूरच्या वसंधुरा रुग्णालयात त्यांची जी शस्त्रक्रिया झाली त्यामध्ये डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. प्रियांका बिश्नोई ( Priyanka Bishnoi ) यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावरही व्हायरल झाली. लोकांनी या प्रकरणासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
वसुंधरा रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया
सुरुवातीला शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रियांका बिश्नोई जोधपूरच्या वसुंधरा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती ही बिघडली. शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अहमदाबाद येथील सिम्स रुग्णालयात त्यांना आणण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे.
भजनलाल शर्मा यांनी काय म्हटलं आहे?
राजस्थानच्या प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकारी प्रियांका बिश्नोई यांच्या मृत्यूची बातमी दुःखद आहे. मी प्रभू रामचंद्राकडे त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो आहे. तसंच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून त्यांना सावरण्याची शक्ती देओ अशीही प्रार्थना करतो. असं भजनलाल शर्मा यांनी म्हटलं आहे.