Priyanka Gandhi vs PM Narendra Modi on Narendra Modi : लोकसभेत सोमवारी (८ डिसेंबर) ‘वंदे मातरम’वरील विशेष चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचे तुकडे केल्याचा आरोप केला. यावर काँग्रेसच्या सरचिटणीस तथा वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी सतत नेहरूंनी चुका केल्याचा दावा करत असतात आणि संसदेचा मौल्यवान वेळ वाया घालवत असतात. त्यापेक्षा त्यांनी एकदाच त्यांच्या लेखी नेहरुंच्या ज्या चुका आहेत त्याची यादी करून संसदेत सादर करावी, मग आपण त्यावर चर्चा करुया.”
काँग्रेस खासदार म्हणाल्या, “काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक यादी सादर केली होती. विरोधी पक्षांनी, विरोधी पक्षांमधील नेत्यांनी त्यांचा किती वेळा अपमान केला आहे याची यादी तयार केली होती. या यादीत ९९ अपमान नमूद केले होते. मी यावरून पंतप्रधान मोदी यांना एक सल्ला देऊ इच्छिते.”
“नेहरुंबाबतच्या तुमच्या तक्रारींची यादी तयार करा”
प्रियांका गांधी म्हणाल्या, “मोदी व भाजपाच्या हिशेबाने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आतापर्यंत जितक्या चुका केल्या असतील, त्यांच्या नेहरुंबाबत ज्या तक्रारी असतील, त्यांना नेहरूंना ज्या शिव्या द्यायच्या असतील, त्यांना नेहरुंचा जितका अपमान करायचा असेल त्या सगळ्याची एक यादी बनवा. ९९९ अपमानाची अथवा ९९९९ अपमानांची यादी बनवा. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांशी चर्चा करून आपण एक वेळ निश्चित करू आणि लोकसभेत त्यावर चर्चा करू. आज आपण ‘वंदे मातरम’बाबत जशी चर्चा करत आहोत अशीच चर्चा आपण नेहरुंबाबतच्या तुमच्या तक्रारींबाबत करू.”
“तुम्ही शांत झालात की जनतेचे प्रश्न पाहू”, प्रियांका गांधींचा मोदींना सल्ला
“आपण लोकसभा अध्यक्षांना विचारून वेळ मागून घेऊ. १० तास, २० तास, ३० तास किंवा ४० तास मागून घेऊ. त्या ४० तासांत तुमच्या सर्व तक्रारींवर चर्चा पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे. तुम्ही ती चर्चा करून शांत व्हा. कितीही वेळ लागला तरी चालेल. परंतु, तुमच्या मनातील सगळ्या तक्रारींवर चर्चा होऊ द्या, तुम्ही एकदा का शांत झालात की मग आपण जनतेच्या प्रश्नांकडे वळायला हरकत नाही.”
“चला हा विषय संपवून टाकू”
प्रियांका गांधी म्हणाल्या, “या सभागृहाचा एकेक मिनिट खूप मौल्यवान आहे. जनतेने त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपल्याला इथे पाठवलं आहे. एकदा का तुमच्या मागण्यांवर ४० तास चर्चा झाली की मग आपण फक्त लोकांच्या मुद्द्यांवर येथे चर्चा करू. कारण त्यासाठीच तर जनतेने आपल्याला इथे पाठवलं आहे. इंग्रजीत म्हणतात तसं, वन्स अँड फॉर ऑल, लेट्स क्लोज द चाप्टर.”
