उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित व्हायला अजून वेळ असला तरी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक पक्षांच्या एकमेकांशी युती करण्याच्या चर्चाही सुरू आहेत. दरम्यान, अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली ते लखनऊ या विमानात दोघे समोरासमोर आल्याचा हा फोटो आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अखिलेश आणि प्रियांकाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या दरम्यान दोघांमध्ये काही मिनिटे संभाषण झाले. दोघांनी एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

अखिलेश यादव शुक्रवारी दिल्लीला पोहोचले होते. त्यांनी मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली. या बैठकीनंतरच अखिलेश लखनऊला परतत होते. काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी वड्रा देखील लखनऊला येत होत्या. प्रियांका गांधी शनिवारी बाराबंकी येथे काँग्रेसच्या ‘प्रतिज्ञा यात्रेला’ झेंडा दाखवणार आहे. प्रियंका गांधींच्या एका सहाय्यकाने हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की, दोघांमध्ये “मैत्रीपूर्ण” संभाषण झाले. त्यांनी एकमेकांना लवकरच भेटले पाहिजे असे सांगितले. निवडणुकीला पाच महिन्यांपेक्षा कमी अवधी शिल्लक असताना दोन्ही पक्ष मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाजपा सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे नेते उदवीर सिंह यांनी कोणतीही युती होणार नसल्याचे म्हटले आहे. “दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची युती होण्याची शक्यता नाही, कारण अखिलेशने आधीच सांगितले आहे की आम्ही कोणत्याही राष्ट्रीय पक्षाशी युती करणार नाही, फक्त लहान पक्षांशीच युती करणार आहोत. जे भाजपा सरकारला धोरणात्मकपणे पाडण्यास मदत करू शकतात, असे उदवीर सिंह म्हणाले.

२०१७ मध्ये काँग्रेस आणि सपाने एकत्र निवडणूक लढवली होती. ‘यूपी को ये साथ पासंद है’ या मोहिमेत दोन्ही पक्ष एकत्र आले होते, पण दोन्ही पक्षांना चांगली कामगिरी करता आली नाही. ४०३ जागांपैकी भाजपाने ३१२ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला फक्त सात जागा मिळाल्या होत्या, तर सपाचे ४९९ आमदार निवडून आले होते. यानंतर दोन्ही पक्षांची युती तुटली. यावेळी अखिलेश यांनी म्हटले आहे की ते कोणत्याही मोठ्या पक्षाशी युती करणार नाहीत. आम्ही सर्व प्रयोग केले आहेत, पण यावेळी युती फक्त छोट्या पक्षांसोबत केली जाईल, असे अखिलेश यादव म्हणाले होते.  पण फोटो व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा दोन पक्षांमध्ये युती होईल की नाही याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.