मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात सुरत कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर आता काँग्रेस खासदार राहुल गांधींना मोठा धक्का बसला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा सवाल करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी २३ मार्च रोजी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयानं ही मोठी कारवाई केली आहे.
दरम्यान, राहुल यांच्यावरील कारवाईनंतर आता त्यांची बहीण प्रियांका गांधी मोदी सरकारवर तुटून पडल्या आहेत. त्यांनी माध्यमांसह सोशल मीडियावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रियांका गांधी यांनी काही ट्वीट करून त्यांचा राग व्यक्त केला आहे.
प्रियांका गांधी यांनी एकापाठोपाठ चार ट्वीट केले आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “मोदीजी, तुमच्या चमच्यांनी शहीद पंतप्रधानांच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर म्हटलं होतं. राहुल गांधींचे वडील कोण आहेत? असा सवाल तुमच्या एका मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला होता. काश्मिरी पंडितांच्या प्रथेनुसार एक मुलगा आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर पगडी घालतो, त्यांची कौटुंबिक परंपरा कायम ठेवतो.”
काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणाल्या की, “संसदेत तुम्ही आमच्या संपूर्ण कुटुबाचा, काश्मिरी पंडितांचा अपमान केला, राहुल गांधींना विचारलंत की, ते नेहरू आडनाव का लावत नाहीत. परंतु कोणत्याही न्यायाधीशाने तुम्हाला दोन वर्षांची शिक्षा सुनावली नाही अथवा तुम्हाला संसदेत अपात्र ठरवले नाही. राहुल गांधींनी गौतम अदानी, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांच्यावर सवाल उपस्थित केले. तुमचा मित्र गौतम अदाणी हा या देशापेक्षा, इथल्या जनतेपेक्षा मोठा झालाय का? त्याने केलेला लुटीबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर तुम्ही सैरभैर झालात.”
हे ही वाचा >> राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चोराला चोर…”!
सत्तापिपासू हुकूमशहापुढे झुकणार नाही : गांधी
प्रियांका गांधी म्हणाल्या की, “आमचं कुटुंब घराणेशाही करतं असा तुम्ही आरोप करता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा या देशाची लोकशाही या कुटुंबाने त्यांच्या रक्ताने उभी केली आहे. ज्यांना तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करत आहात त्या कुटुंबाने भारतातल्या जनतेचा आवाज बुलंद केला आहे. आमच्या धमण्यांमधून धावणाऱ्या रक्ताची एक खासियत आहे. तुमच्यासारख्या भ्याड, सत्तापिपासू हुकूमशहापुढे ते कधीही झुकणार नाही आणि झुकणार नाही. तुम्हाला हवं ते करा.”