काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या उत्तर प्रदेशातील वाढत्या सक्रियतेच्या पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने मोठं विधान केलं आहे. “आम्ही प्रियांका गांधी यांना लवकरच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करू शकतो”, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केलं आहे. खुर्शीद म्हणाले की, “आम्ही २०२२ ची युपी विधानसभा निवडणूक प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. प्रियांका गांधी इथे काँग्रेसच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. त्याचसोबत पुढे आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करू शकतो.” दरम्यान, यापूर्वी काँग्रेसने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी एक प्रोमो प्रसिद्ध केला आहे. ज्यात प्रियांका गांधी यांचा उल्लेख ‘उत्तर प्रदेशची आशा’ असा केला गेला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ करिता काँग्रेसने एक ‘प्रतिज्ञा यात्रा’ काढण्याची देखील घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या या निवडणुकीपूर्वी पक्षाने राज्यातील सर्वसामान्य लोकांसोबतचा संपर्क अधिक वाढवण्यासाठी घरोघरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून हा तब्बल १२ हजार किलोमीटर इतका लांबचा प्रवास केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाकडून या यात्रेला “काँग्रेस प्रतिज्ञा यात्रा: हम वचन निभाएंगे” असं नाव देण्यात आलं आहे. ही यात्रा राज्याच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतून हा प्रवास करेल. त्यामुळे, उत्तर प्रदेश विधानसभेत यश मिळवण्यासाठी आता काँग्रेसने कंबर कसली आहे. ज्यात प्रियांका गांधी हा काँग्रेसचा चेहरा असतील.

अद्याप कोणाशीही युती करण्याचे संकेत नाहीत

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्यावरील पहिला प्रोमो देखील प्रसिद्ध केला आहे. यामध्ये प्रियंका गांधी यांचं वर्णन ‘उत्तर प्रदेशची आशा’ असं करण्यात आलं आहे. दरम्यान, काँग्रेसने इथे अद्याप कोणत्याही मोठ्या पक्षासोबत विधानसभा निवडणुकीत युती करण्याचे संकेत दिलेले नाहीत. मात्र, या निवडणुकीकरिता काँग्रेस एका छोट्या पक्षाशी हातमिळवणी करणार असल्याची शक्यता आहे.