उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी घोषणा केली आहे की, पक्ष राज्यात सरकार स्थापन झाल्यावर १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि आरोग्य सुविधा देईल.

एका ट्विटमध्ये प्रियंका गांधी म्हणाल्या, “कोविड-१९ महामारीच्या काळात उत्तरप्रदेशातील आरोग्य व्यवस्थेची ढासळलेली स्थिती प्रत्येकाने पाहिली, जी सध्याच्या सरकारच्या उदासीनतेचा आणि दुर्लक्षाचा परिणाम आहे. उत्तरप्रदेश काँग्रेसने ठरवले आहे की, जेव्हा उत्तरप्रदेशमध्ये जेव्हा काँग्रेसचे सरकार येईल तेव्हा कोणत्याही आजारावर मोफत उपचार केले जातील. १० लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार उचलणार आहे.

याआधी, प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथून काँग्रेसच्या “प्रतिज्ञा यात्रे” ला झेंडा दाखवला होता, ज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पुढील वर्षी विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यास २० लाख लोकांना नोकऱ्या देण्यासह सात आश्वासने दिली होती.

काँग्रेसने गहू आणि धान खरेदी २,५०० रुपये प्रति क्विंटल आणि उसाला ४०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. २० लाख लोकांना नोकऱ्या देण्याव्यतिरिक्त, प्रियंका गांधींनी सांगितले की जर राज्यात काँग्रेस सत्तेवर आले तर त्यांचा पक्ष सर्वांचे वीज बिल अर्ध्यावर आणेल.

हेही वाचा – लढाई रंगू लागली!

काँग्रेस महिलांना ४० टक्के तिकिटे देणार असल्याचा पुनरुच्चार करून महिलांसाठी वेगळा जाहीरनामा आणेल, असेही त्या म्हणाल्या. सत्तेत आल्यास १२ वी उत्तीर्ण मुलींना स्मार्टफोन आणि पदवीधर मुलींना ई-स्कूटर देणार असल्याचा पुनरुच्चारही पक्षाने केला. कोविड संकटामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबांना २५,००० रुपये देणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. प्रियंका यांनी आठवड्याभरात महिलांसाठी स्वतंत्र घोषणापत्र देण्याचे आश्वासन दिले आणि राजकारणात त्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले.