काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू आणि पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीपासून रोखल्यानं मोदी सरकारसह उत्तर प्रदेश पोलिसांवर सडकून टीका केलीय. हा देश शेतकऱ्यांनी बनवलं आहे आणि समृद्ध केलाय. हा देश शेतकऱ्यांचा आहे, भाजपची जहागिरी नाही, असं मत प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलं. तसेच हे सरकार शेतकऱ्यांना चिरडून संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

प्रियंका गांधी म्हणाल्या, “या देशात शेतकऱ्यांना चिरडलं जातंय. अनेक महिन्यांपासून शेतकरी आमच्यासोबत चुकीचं होतंय सांगत आपला आवाज उठवत आहेत. मात्र, सरकार ऐकायला तयार नाही. जे होतंय त्यावरुन हेच दिसतंय की हे सरकार शेतकऱ्यांना चिरडण्याचं आणि संपवण्याचं राजकारण करतंय. हा देश शेतकऱ्यांचा देश आहे, भाजपची जहागिरी नाहीये. या देशाला शेतकऱ्यांनी बनवलं आणि समृद्ध केलंय. बळाचा वापर करावा लागतो म्हणजे सरकार आणि पोलिसांचा नैतिक अधिकार संपला आहे.”

“मी माझ्या घरातून बाहेर पडून काही गुन्हा करायला जात नाहीये. मी केवळ पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात आहे. मी त्यांचे अश्रू पुसायला जात आहे. यात कोणती वाईट गोष्ट आहे. मी काय चुकीचं करतेय? मी जर काही चुकीचं करत असेल तर पोलिसांकडे आदेश किंवा वॉरंट असला पाहिजे. ते नसताना पोलीस मला अडवत आहेत, माझी गाडी अडवत आहेत. हे सर्व कशासाठी? मी सीईओला बोलावत आहे तर ते लपत आहेत. जर बरोबर काम करत आहेत तर मग लपत का आहेत?” असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.

राजकीय पडसाद…

या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. हा नरसंहार असून, शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. समाजवादी पक्ष, राजदसह अन्य पक्षांनीही या घटनेवरून भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत रविवारी गाझिपूरहून लखीमपूर खेरीकडे गेले.

नेमकं काय घडले?

केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या बनवीरपूर या मूळ गावात काही विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. ज्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, तेथेच सकाळपासून शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन धरणे धरले होते. समजूत काढूनही ते तेथून हलण्यास तयार नव्हते. तेथे शेतकऱ्यांच्या जमावात दोन मोटारी घुसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हिंसाचार घडला. 

आज देशभर निदर्शने

लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ आज, सोमवारी देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली. या घटनेची उत्तर प्रदेश प्रशासनाकडून नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. काँग्रेसनेही या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा