काँग्रेसच्या कर्नाटकमधील आमदार के. आर. रमेश कुमार यांनी बलात्काराची मजा घ्या असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यावर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रियंका गांधी यांनी बलात्काराबाबतच्या या वक्तव्याचा निषेध करत त्याला अक्षम्य वक्तव्य म्हटलं.

प्रियंका गांधी म्हणाल्या, “के. आर. रमेश कुमार यांनी केलेल्या वक्तव्याचा मी अगदी मनापासून निषेध करते. असं कुणी कसं बोलू शकतं? हे अक्षम्य आहे. बलात्कार हा क्रूर गुन्हा आहे. पूर्णविराम.”

नेमकं प्रकरण काय?

गुरुवारी राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावर बोलण्यासाठी काँग्रेस नेते वेळ मागत होते, मात्र सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी टाळण्याचा प्रयत्न करत होते. “तुम्ही जे काही ठरवाल त्याला मी हो म्हणेन. मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत आहोत. मी व्यवस्था नियंत्रित करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,” असे सभापतींनी आमदारांना सांगितले.

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे आमदार रमेश कुमार यांनी सभापतींना उत्तर देताना सांगितलं की, “एक म्हण आहे की जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो तेव्हा झोपा आणि मजा करा. तुम्ही अगदी त्याच स्थितीत आहात.” आश्चर्याची गोष्ट म्हणजे रमेश कुमार यांच्या या असभ्य वक्तव्यावर सभागृहात उपस्थित असलेले वक्ते आणि इतर काही नेते हसताना दिसले. कुमार यांनी यापूर्वी २०१८-१९ मध्येही विधानसभेचे अध्यक्ष असताना अशी टिप्पणी केली होती.

वादानंतर काँग्रेस आमदार रमेश कुमार यांनी या वक्तव्यावर माफी मागितली आहे.

दरम्यान, यापूर्वी कर्नाटक विधानसभा अध्यक्ष असताना रमेश कुमार यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या महिला सदस्यांसह आमदारांनी अधिवेशनात त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला होता. “अशा घृणास्पद आणि निर्लज्ज वर्तनासाठी सभागृहाने संपूर्ण स्त्रीत्वाची, प्रत्येक माता, बहीण आणि मुलींची माफी मागितली पाहिजे,” असे आमदार सौम्या रेड्डी यांनी म्हटले होते.

हेही वाचा : “जेव्हा बलात्कार थांबवता येत नाही, तेव्हा झोपा आणि मजा करा”; काँग्रेस आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

फेब्रुवारी २०१९ मध्ये रमेश कुमार यांनी, माझी अवस्था बलात्कार पीडितेसारखी झाली आहे. बलात्कार फक्त एकदाच झाला. तिथं सोडलं असतं तर ते संपलं असतं. बलात्कार झाल्याची तक्रार केल्यावर आरोपीला तुरुंगात टाकले जाते. हे कसे, कधी आणि किती वेळा घडले याची चौकशी त्यांचे वकील किंवा ईश्वरप्पा (तेव्हाचे आमदार आणि आता भाजपाचे मंत्री) यांच्यासारखे करतात असे म्हटले होते. खटल्याच्या शेवटी, पीडिता म्हणेल की उलटतपासणी दरम्यान बलात्कार प्रत्यक्षात एकदाच झाला होता, परंतु कोर्टात अनेक वेळा झाला. माझीही अवस्था अशीच झाली आहे, असे धक्कादायक वक्तव्य रमेश कुमार यांनी केले होते.