लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर प्रियांका गांधी मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेल्या असता त्यांना आणि राहुल गांधींना अडवण्यात आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. उत्तर प्रदेश पोलिसांवर आणि सरकारवर यावरून काँग्रेसने बरीच टीका देखील केली होती. त्यानंतर प्रियांका गांधी आणि राहुल गांधी या दोघांनाही संबंधित कुटुंबीयांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, आता यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये प्रियांका गांधी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच सुनावताना दिसत आहेत. झी न्यूजनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ सीतापूरमधला असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटायला जाण्यापूर्वी प्रियांका गांधी सीतापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांना पुढे जाऊ नये यासंदर्भात सांगण्यासाठी आलेल्या जिल्हा प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनाच त्यांनी सुनावलं. “मी तुमच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही”, असं प्रियांका गांधी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

संबंधित अधिकारी प्रियांका गांधींना “मी तुम्हाला फक्त दोन विनंत्या करू इच्छितो, जर तुम्ही ऐकणार असाल तर”, असं सांगताना दिसत आहे. त्यावेळी प्रियांका गांधी यांनी तावातावाने या अधिकाऱ्यालाच सुनावल्याचं व्हिडीओत दिसत आहे. “मी काहीही बिघडवणार नाहीये. मी फक्त त्या लोकांची भेट घेणार आहे. मी तुम्हाला माझं नियोजन देते, पण मी तुमच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही. कारण तुम्ही अशा सरकारचे प्रतिनिधी आहात, जे पूर्णपणे लोकशाहीविरोधी आहे आणि अपयशी ठरलेलं आहे”, अशा शब्दांत प्रियांका गांधींनी त्या अधिकाऱ्याला सुनावलं आहे.

बऱ्याच वादानंतर प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांना मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी प्रियांका गांधींनी शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन या कुटुंबीयांना दिलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधींचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या गेस्टहाऊसमध्ये झाडू मारताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून देखील मोठी चर्चा झाल्याचं दिसून आलं होतं.

त्याशिवाय, उत्तर प्रदेश पोलीस प्रियांका गांधींवर कारवाई करण्यासाठी आले असताना देखील त्यांनी पोलिसांना सुनावल्याचं दर्शवणारा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi guest house viral video with district officer pmw
First published on: 08-10-2021 at 14:07 IST