Priyanka Gandhi Lok Sabha Speech: संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरुन वादळी चर्चा सुरु झाली आहे. विरोधी बाकावरुन महिला आरक्षणाला समर्थन दिले जात असले तरी त्यात राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे. तर, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी यावेळी चाणक्यांचा उल्लेख करत अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस महिला आरक्षणाच्या विधेयकला समर्थन देत आहे पण, यात राजकारणाचा वास येत असल्याचा आरोप प्रियांका यांनी केला.

विधेयकांसाठी सरकार घाई करतंय – प्रियांका गांधी

राजकीय फायदा घेण्यासाठी एनडीए सरकारने महिला आरक्षणाचा घाट घातला असल्याचे प्रियांका गांधी लोकसभेत भाषण करताना म्हणाल्या. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा दाखला देखील यावेळी दिला. “भाजपा भारतीय संविधानाला धक्का लावून पक्ष मजबूत करण्याच्या मागे लागले आहे”, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. “विधेयकांना घेऊन सरकार घाई करत आहे. २०११ च्या जनगणनेवर आधारीत मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जे योग्य नाही. बदल करण्यासाठी अद्यावत माहिती आणि आकडेवारी गरज आहे”, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

ओबीसींचा मुद्दा

“संसदेचा ५० टक्के विस्तार करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे, पण या दिशेने ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येते. याबाबत विधेयकात स्पष्टता नसल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गंधींवर संसदेत मस्करी केली जाते पण गंभीर विषयांवर त्यांनी मांडलेल्या मुद्यांचाच विचार केला जातो. ओबीसी वर्गाच्या हितांबाबत बोलले जाते पण दुसरीकडे त्यांचे अधिकार कमजोर केले जात आहेत”, असे प्रियांका गांधी संसदेत म्हणाल्या.

मोदी आणि शाहांवर टीका

“जनगणना केल्यानंतर ओबीसी वर्गाची खरी आकडेवारी समोर येईल, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत”, असे प्रियांका गांधी महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर बोलताना म्हणाल्या. “२०११ च्या जनगणेच्या आधारावर सरकार मतदारसंघ पुनर्रचना करु पाहत आहे. यामाध्यमातून ते ओबीसी वर्गाचे हक्का काढून घेण्याचा आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहे”, असा आरोपही गांधी यांनी केला. आसाममध्ये केलेल्या पुनर्रचना सदोष असल्याचे सांगताना, “आज चाणक्य जिंवत असते तर त्यांना धक्का बसला असता”, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. सध्या लोकसभेत ५४३ जागा असून, त्यासाठी ३३ टक्के महिला आरक्षण का लागू करण्यात आले नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.