Priyanka Gandhi Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘जेन झीं’चे समर्थन केले आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन प्रियांका गांधींनी प्रतिक्रिया देताना तरुण आंदोलकांना मोहन भागवत यांच्या कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही, असे वक्तव्य केले आहे. मोहन भागवत यांनी गुरुवारी मुंबईतील एका कार्यक्रमात जेन झींशी संवाद साधला. तरुणांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत भागवतांनी त्यांना पाठिंबा दिला होता. तरुणांनी केलेले आंदोलन त्यांना राष्ट्रविरोधी ठरवत नाही, असेही भागवत म्हणाले.
भागवत यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही – प्रियांका गांधी
मोहन भागवत यांनी यावेळी लोकशाहीत निदर्शने संवादाचे एक वैध माध्यम असल्याचेही स्पष्ट केले. भागवत यांच्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रियांका गांधी यांनी संसद भवन परिसरात उत्तर दिले. “तरुणांना मोहन भागवत यांच्या प्रमाणपत्राची अजिबात गरज नाही,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी प्रियांका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. गृहमंत्री घाबरले आहेत असा आरोप करत त्यांनी अमित शाह संसदेच्या दोन्ही सभागृहांत अनुपस्थित का आहेत? असा सवाल उपस्थित केला.
अमित शाहांवर टीका
नीट पेपरफुटी प्रकरणी २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि इतर कारवाईचा उल्लेख यावेळी प्रियांका गांधी यांनी यावेळी केला. “शाहांनी सभागृहात येऊन याप्रकरणी भूमिका स्पष्ट करायला हवी, यात अडचण काय आहे? काही चुकीचे घडले असेल, तर त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या.
मोहन भागवत काय म्हणाले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत ‘इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली होती. भारतातील शिक्षणव्यवस्थेबाबत व्यक्त केलेल्या चिंता रास्त आहेत. तसेच शिक्षण क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून शिक्षणावरील खर्च ‘जीडीपी’च्या ६ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आवाहन यावेळी मोहन भागवत यांनी केले. नीट आंदोलनाबाबत बोलताना भागवत म्हणाले की, “जेन-झी तरुण आंदोलन करत असतील, तर ते राष्ट्रविरोधी नाहीत; ते आपलेच लोक आहेत. ती आपली पुढची पिढी आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे,” असे भागवत म्हणाले. “जेन-झीच्या समस्या रास्त आहेत आणि त्यांच्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास आहे,” असे भागवत यांनी यावेळी नमूद केले.
