लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेमध्ये केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर तोंडसुख घेतले. लोकसभाध्यक्षांचा आदेश अंतिम असतो, पण राहुल गांधी ऐकूनही घ्यायला तयार नव्हते. त्यांच्यापेक्षा प्रियंका गांधी-वढेरा चांगल्या विरोधी पक्षनेत्या झाल्या असत्या. निदान त्या संसदेत येतात आणि ऐकून तरी घेतात, अशा शब्दांत रिजिजू यांनी टीका केली.
रिजिजूंनी प्रियंका गांधींच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींवर धरलेला नेम तितक्याच तत्परतेने प्रियंका यांनी परतवून लावला. या देशात गेल्या १२ वर्षांत सत्ताधार्यांसमोर (भाजप) कधीही झुकला नाही अशी ही एकच व्यक्ती (राहुल गांधी) आहे. राहुल गांधी बोलत असलेले सत्य सत्ताधार्यांना पचवता येत नाही, असे प्रत्युत्तर प्रियंका गांधी यांनी दिले. केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी, माजी लोकसभाध्यक्ष ग. वा. मावळणकर यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी काय म्हटले होते, याचे उतारे वाचून दाखवले. त्यावरही टिप्पणी करताना प्रियंका गांधी यांनी रिजिजूंना शब्दांत पकडले. सत्ताधारी नेते सातत्याने पं. नेहरूंवर टीका करत असतात, आत्ता रिजिजूंना पं, नेहरूंचा आधार घ्यावा लागला आहे. त्यांच्याबद्दल चांगले बोलावे लागले आहे, असा टोमणा प्रियंका यांनी मारला.
बिर्लांच्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी लोकसभेत चर्चा सुरू झाली. मात्र विरोधी पक्षनेते राहुल गांधी सभागृहात उपस्थित नव्हते. त्याचा संदर्भ घेऊन रिजिजू यांनी टीका केली. लोकसभाध्यक्षांच्या परवानगीशिवाय सदस्यांना बोलता येत नाही, हा नियम आहे. पण राहुल गांधी म्हणतात की, त्यांना परवानगीची गरज नाही. सभागृहात बोलणे हा त्यांचा अधिकार आहे. राहुल गांधींना नियमही माहीत नाहीत. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते वा इतर सदस्य लोकसभाध्यक्षांच्या परवानगीशिवाय सभागृहात बोलू शकत नाही, असे रिजिजू म्हणाले.
