Priyanka Gandhi vs Narendra Modi on Pandit Nehru : काँग्रेस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय गीताचे तुकडे केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (८ डिसेंबर) लोकसभेत ‘वंदे मातरम’वरील विशेष चर्चेवेळी केला. “१९३७ मध्ये मुस्लीम लीगपुढे वाकून नेहरूंनी ‘वंदे मातरम’मधील प्रमुख ओळी वगळल्या. मुस्लिमांच्या भावना भडकतील, असं नेहरूंचं म्हणणं होतं. त्यातूनच देशाच्या फाळणीची बीजे रोवली गेली”, असा दावा मोदी यांनी केला. तर, काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मोदींचे आरोप खोडून काढले. त्या म्हणाल्या, “मोदी अपूर्ण माहिती देतात, तथ्यांना वगळून आरोप करतात. निवडक प्रसंग, वक्तव्यांचा वापर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.”
प्रियांका गांधी म्हणाल्या, “देशातील लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार असे वेगवेगळे मुद्दे पुढे आणतंय. आगामी पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा सगळा प्रकार चालू आहे. पंतप्रधान मोदी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर सतत आरोप करत असतात. मात्र, मोदी जितकी वर्षे पंतप्रधानपदावर आहेत तितकी वर्षे नेहरू तुरुंगात होते.”
“वंदे मातरममुळे राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते”
वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या, “आपल्या संसदेत राष्ट्रीय गीतावर चर्चा होत आहे. आपण जेव्हा वंदे मातरम गातो किंवा उल्लेख करतो तेव्हा राष्ट्रीयत्त्वाची भावना निर्माण होते. या गाण्यामुळे स्वातंत्र्य संग्रामाची आठवण होते. कारण ब्रिटिश सरकार देखील यासमोर झुकलं होतं.”
“आपले पंतप्रधान गेल्या १२ वर्षांपासून या पदावर आहे. तेवढी वर्षे तर नेहरू तुरुंगात होते. त्यानंतर १७ वर्षे ते पंतप्रधान राहीले.”
“नेहरुंवर बोला, पण लोकांनी आपल्याला इथे कशासाठी पाठवलंय ते विसरू नका”, प्रियांका गांधींचा मोदींना सल्ला
प्रियांका गांधी मोदींना आव्हान देत म्हणाल्या, “नेहरुंचा अपमान करण्यासाठी तुमच्या मनात जितक्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जमा करा. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची परवानगी घेऊन सभागृहात त्यावर चर्चा घडवून आणा. परंतु, जनतेने आपल्याला इथे कशासाठी पाठवलंय ते विसरू नका. तुम्ही इथे जनतेच्या प्रश्नांवरही बोला. बेरोजगारी, गरिबी, प्रदूषण आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर देखील चर्चा करा.”
पंडित नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तसेच, नेहरू व रवींद्रनाथ टागोर यांच्यातील पत्रव्यवहारातील संबंधित उतारे प्रियंका यांनी वाचून दाखवले. त्या म्हणाल्या, “वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून निवडण्यामागील घटनांचा कालक्रम समजून घेतला पाहिजे. मोदींनी नेहरूंच्या २० ऑक्टोबर १९३७च्या पत्राचा उल्लेख केला होता. त्यासंदर्भात प्रियंका म्हणाल्या की, “नेहरूंनी नेताजींना लिहिलेल्या पत्राच्या तीन दिवस आधी नेताजींनी नेहरूंना पत्र लिहून ‘वंदे मातरम’वर काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये चर्चा करण्याची गरज व्यक्त केली होती. पण, त्याचा उल्लेख तुमच्या पंतप्रधानांनी उल्लेख केला नाही.”
