Priyanka Gandhi on Vande Mataram : काँग्रेस व पंडित नेहरुंनी ‘वंदे मातरम’ या आपल्या राष्ट्रीय गीताचे तुकडे केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (८ डिसेंबर) लोकसभेत केला. त्यावर उत्तर देताना खासदार तथा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी वंदे मातरम लिहिण्यापासून ते राष्ट्रीय गीत घोषित करण्यापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. हे गीत टप्प्याटप्प्याने कसं बदलत गेलं, त्यामध्ये वाढवलेली कडवी, स्वातंत्र्यलढ्यावेळी केलेला वापर आणि देशातील तत्कालीन प्रमुख नेत्यांचं त्यावरील मत अशा सगळ्या गोष्टी प्रियांका गांधी यांनी उलगडल्या.
प्रियांका गांधी म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ साली एका अधिवेशनात हे गीत सर्वप्रथम गायलं. परंतु मोदींनी सांगितलं नाही की कुठल्या कार्यक्रमात हे गीत गायलं. टागोरांनी हिंदू महासभा किंवा आरएसएस नव्हे तर राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात हे गीत सर्वप्रथम गायलं होतं.”
वंदे मातरम गीत कधी लिहिलं? सर्वप्रथम कुठे सादर केलं?
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या, “मी तुम्हाला खरा घटनाक्रम सांगते. १८७५ साली महाकवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या गीताची केवळ दोन कडवी लिहिली होती, जी आज राष्ट्रीय गीत म्हणून गायली जातात. त्यानंतर १८८२ साली चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ ही कादंबरी प्रकाशित केली. त्यावेळी त्यांनी वंदे मातरम या गीतात आणखी चार कडवी वाढवली. तर, १८९६ मध्ये काँग्रेसच्या एका अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गाऊन सर्वांना प्रेरित केलं. रवींद्रनाथ टागोर हे स्वतः वंदे मातरम गीत गात बंगालच्या रस्त्यांवर उतरले आणि ब्रिटिशांविरोधात त्यांनी आंदोलनाची हाक दिली. हे गीत पुढे अनेक दशकं आपल्याला प्रेरणा देत राहिलं.”
वंदे मातरमबाबत नेहरू व नेताजींमध्ये पत्रव्यवहार
“१९३० च्या दशकात देशात धार्मिक वादंग निर्माण झाला होता. त्याच काळात हे गीत वादात अडकलं. त्यानंतर १९३७ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे कोलकाता येथे काँग्रेसच्या अधिवेशनाचं आयोजन करत होते तेव्हा नेताजींनी पंडित नेहरुंना पत्र लिहिलं आणि या गीताबाबतच्या वादाकडे लक्ष वेधलं असं मोदी यांनी सांगितलं. मात्र ती माहिती अपूर्ण आहे. नेताजींनी २० ऑक्टोबर १९३७ रोजी नेहरुंना पत्र लिहिलं होतं. मात्र, त्याच्या तीन दिवस आधी नेहरुंनी नेताजींना एक पत्र पाठवलं होतं आणि त्यात म्हटलं होतं की आपण यावर चर्चा करणं आवश्यक आहे.”
“नेताजी सुभाषचंद्र बोस नेहरुंना म्हणाले होते की आपण वंदे मातरमबाबत रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबर बोलायला हवं. त्यावर नेहरू म्हणाले, हो निसंकोचपणे आपण त्यांच्याशी बोलू. त्यानंतर दोघांनी टागोर यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेनंतर टागोर यांनी नेहरुंना एक पत्र पाठवलं. ज्यामध्ये ते म्हणाले की पूर्वी या गाण्याची केवळ दोन कडवी गायली जात होती. ती तशीच गायला हवी. मात्र, धार्मिक तेढ पाहता त्यातील काही भाग वगळता येऊ शकतो. कारण सध्याच्या स्थितीत तो भाग वापरण योग्य ठरणार नाही.”
प्रियांका गांधी म्हणाल्या, “पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर यांनी चर्चा करून या गाण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यसमितीने वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत म्हणून घोषित केलं. यावर महात्मा गांधी, आचार्य नरेंद्र देव, वल्लभभाई पटेल, यांचं देखील अनुमोदन मिळालं होतं.”
