अयोध्येतील जमीन खरेदीत नेमका काय घोटाळा होतोय? प्रियांका गांधींनी केला खळबळजनक दावा!

५ मिनिटांत जमिनीची किंमत १६.५ कोटींनी वाढली? अयोध्येमध्ये नेमका कसा घोटाळा होतोय, याबाबत प्रियांका गांधींनी गंभीर आरोप केले आहेत.

priyanka gandhi on ayodhya land scam ram janmabhoomi trust
प्रियांका गांधींनी अयोध्येतील कथित जमीन घोटाळाप्रकरणी गंभीर आरोप केला आहे.

देशभरात सध्या चर्चा आहे ती अयोध्येमध्ये होत असलेल्या कथित जमीन खरेदी-विक्री घोटाळ्याची! अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिराच्या आसपासची जमीन खरेदी-विक्रीमध्ये घोटाळा होत असल्याचा प्रकार समोर आला असून त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. मात्र, यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी तीव्र आक्षेप घेत गंभीर दावे केले आहेत. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रियांका गांधी यांनी या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर जमिनीचे व्यवहार

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर मंदिरासाठीच्या जमिनीच्या आसपास असलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्रीमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा घोटाळा नेमका कसा होत आहे, याविषयी प्रियांका गांधी यांनी खबळजनक दावा केला आहे.

“उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी यासंदर्भात जिल्हा स्तरावरच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पण राम मंदिर ट्रस्ट हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थापन करण्यात आलं आहे. त्यामुळे तपास देखील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फतच केला जावा”, अशी मागणी प्रियांका गांधींनी केली.

“नेमकी किती जमीन आहे कुणालाही माहिती नाही”

राम मंदिराजवळ लूट सुरू असल्याचं प्रियांका गांधी म्हणाल्या. “भाजपा नेते, पदाधिकारी आणि योगी सरकारचे प्रशासकीय अधिकारी या लुटीमध्ये गुंतले आहेत. कुणालाही माहिती नाही की नेमकी किती जमीन आहे आणि या घोटाळ्यात किती कोटींची उलाढाल होत आहे”, असा दावा त्यांनी केला. “राम मंदिर ट्रस्टचा पैसा सरकारी अधिकारी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य यांच्या फायद्यासाठी वापरला जात आहे. ट्रस्टकडून जमिनीची खरेदी अव्वाच्या सव्वा किंमतीला होत आहे”, असं त्या म्हणाल्या.

नेमका कसा होतोय घोटाळा?

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना प्रियांका गांधी यांनी नेमका अयोध्येतील जमिनीचा घोटाळा कसा होतोय, याचं उदाहरण देऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या म्हणाल्या, “२०१७ मध्ये एका जमिनीचा एका व्यक्तीला विक्री झाली होती. ती जमीन आता दोन भागांमध्ये विकली गेली आहे. त्यातला एक १० हजार चौरस मीटरचा भाग थेट राम मंदिर ट्रस्टला ८ कोटी रुपयांना विकला गेला. या व्यवहाराच्या अगदी काही तासांनी दुसरा १२ हजार चौरस मीटरचा भाग रवी मोहन तिवारी नावाच्या व्यक्तीला फक्त २ कोटी रुपयांना विकला गेला. म्हणजे जमिनीचा अर्धा हिस्सा ८ कोटींना विकला आणि दुसरा त्याहून थोडा मोठा हिस्सा फक्त २ कोटींना विकला गेला”.

“पण फक्त ५ मिनिटांमध्ये रवी मोहन तिवारी नावाची व्यक्ती हा दोन कोटींना खरेदी केलेला जमिनीचा तुकडा राम मंदिर ट्रस्टला थेट १८.५ कोटी रुपयांना विकते. आणि या व्यवहारामध्ये कोण साक्षीदार आहे? तर अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा”, असा दावा प्रियांका गांधी यांनी केला.

प्रियांका गांधींचा फिल्मी अंदाज, ‘दीवार’ चित्रपटातला डायलॉग मारून म्हणाल्या; “मेरे पास…!”

विशेष म्हणजे अशाच प्रकारचा आरोप आपचे नेते संजय सिंग यांनी लखनौमध्ये जून महिन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. तसेच, सपा नेते आणि माजी आमदार पवन पांडे यांनी देखील याच मुद्द्यावर आक्षेप घेतला होता. यासंदर्भात आता वातावरण तापू लागलं असून सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priyanka gandhi targets bjp on ram janmabhoomi ayodhya land scam yogi adityanath pmw

Next Story
‘हिंदूंसाठी हत्यारं, मुस्लिमांविरोधात युद्ध’ हरीद्वारमधील सभेत वक्त्यांची वादग्रस्त भाषणं; भाजपाचे माजी पदाधिकारीही उपस्थित!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी