२०१७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून, गेल्या सर्व निवडणुकींच्या तुलनेत यावेळी प्रियांका गांधी अधिक सक्रिय दिसत आहेत. केवळ रायबरेली आणि अमेठीमध्ये प्रचार करताना दिसणाऱ्या प्रियांका गांधी या निवडणुकीत संपूर्ण उत्तर प्रदेशात जवळजवळ १५० सभा घेणार असल्याचे समजते. तसेच आत्तापासूनच त्यांनी पक्षमजबुतीला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे महासचिव आणि पक्षाचे उत्तर प्रदेशातील प्रभारी गुलाम नबी आजाद यांच्याबरोबर साऊथ एवेन्यूमध्ये दररोज चर्चा करून प्रियांका पक्षाची रणनिती ठरवत असल्याची माहिती मिळते. छोटे पक्ष आणि स्थानिय पक्षांबरोबर कशाप्रकारे एकत्र येता येईल यावरदेखील त्या विचार करत असल्याचे समजते. परदेशवारीवर गेलेल्या राहुल गांधींच्या आगमनानंतर प्रियांकाच्या उतर प्रदेशातील जबाबदाऱ्या ठरविण्यात येणार असल्याचे या अगोदर ऐकायला मिळत होते. उत्तर प्रदेश निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून प्रियांकाला पुढे ठेवावे याबाबत पक्षातील अनेक नेत्यांचे एकमत आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांना मोठी जबाबदारी मिळू शकेल, असा संकेत गुलाम नबी आजाद यांनी या अगोदरच दिला होता. प्रियांका गांधी यांनी अमेठी आणि रायबरेलीतून बाहेर पडून उत्तर प्रदेशातील अन्य ठिकाणीदेखील प्रचार करावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सूतोवाचदेखील त्यांनी केले होते.