तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान आणि अजय मिश्रा एकाच मंचावर येणार आहेत. याला काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी विरोध दर्शवत मोदींना पत्र लिहीत आवाहन केलं आहे.

प्रियंका गांधींनी याबाबत ट्विट करत मोदींना पाठवलेले पत्र शेअर केले आहे. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान मोदीजी देशातील शेतकऱ्यांप्रती तुमचे हेतू खरंच साफ असतील तर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांसोबत एका मंचावर विराजमान होऊ नका, त्या मंत्र्यांला निलंबित करा”.

कृषी कायदे रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं प्रियांका गांधींनी स्वागत केलं आहे. तसेच आता लखीमपूर हिंसाचारात गाडीखाली चिरडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणीही या पत्रात केली आहे.

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आहे. परंतु, भाजपा सरकार आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही प्रियंका गांधींनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता देशाला उद्देशून भाषण केले. यावेळी केंद्रानं लागू केलेले कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा मोदींनी केली. संसदेच्या या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.