पीटीआय, न्यूयॉर्क : फरारी कट्टरवादी धर्मप्रचारक अमृतपाल सिंग याला पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठय़ा संख्येत जमलेल्या खलिस्तान समर्थकांनी येथील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये निदर्शने केली. कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असता निदर्शकांनी रविवारी काढलेली मोटार रॅली रिचमंड हिल येथील बाबा माखन शाह लुबाना सिख सेंटरमधून सुरू झाली व शहराच्या मध्यभागी असलेल्या मॅनहॅटनमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये संपली.
कानठळय़ा बसवणारे संगीत व जोरदार भोंगे वाजवत खलिस्तानी झेंडे लावलेल्या आणि अमृतपालची छायाचित्रे झळकावणारा हा मोटारींचा ताफा रस्त्यांवरून जात होता. मोठय़ा संख्येतील महिला, पुरुष व मुले खलिस्तानी झेंडे फडकावत व घोषणा देत टाइम्स स्क्वेअरमध्ये एकत्र आले. या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि न्यू यॉर्क सिटी पोलीस विभागाच्या व्हॅन व मोटारी या ठिकाणी गस्त घालत होत्या. वॉशिंग्टनमधील भारतीय राजदूतावासाबाहेर शनिवारी खलिस्तानी समर्थक गोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही मोटार रॅली काढण्यात आली.
अमृतपालने पलायनाचा प्रयत्न केल्यास अटक करण्याची नेपाळला विनंती
काठमांडू : फरार असलेला कट्टरवादी धर्मप्रचारक अमृतपाल सिंग हा सध्या नेपाळमध्ये दडून बसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्याला एखाद्या तिसऱ्या देशात पळून जाऊ देऊ नये आणि त्याने भारतीय पारपत्र किंवा एखाद्या बनावट पारपत्राच्या आधारावर पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटक करावी अशी विनंती भारताने नेपाळ सरकारला केली आहे.
सिंग याने नेपाळमधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटक करावी अशी विनंती काठमांडूतील भारतीय दूतावासाने वकिलाती सेवा विभागाला शनिवारी पाठवलेल्या पत्रातून नेपाळच्या सरकारी यंत्रणांना केली असल्याचे वृत्त ‘दि काठमांडू पोस्ट’ वृत्तपत्राने दिले. अमृतपाल सिंगला नेपाळमधून कुठल्याही तिसऱ्या देशात प्रवास करण्याची परवानगी न देण्याची सूचना वकिलाती मंत्रालयाने अप्रवासन (इमिग्रेशन) विभागाला द्यावी व त्याने तसा प्रयत्न केल्यास त्याला अटक करावी, असे पत्रात नमूद केले आहे.