“वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज”; योगी सरकारवर राहुल गांधींची टीका

उत्तर प्रदेशात पत्रकाराची हत्या

उत्तर प्रदेशात एका पत्रकारावर काही जणांनी गोळीबार केल्याची घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली. यात पत्रकाराचा मृत्यू झाला असून, या घटनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. “वचन राम राज्याचं होतं, पण दिलं गुंडाराज,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये एका टोळक्यानं भर रस्त्यावर पत्रकारावर हल्ला केला होता. तसेच गोळीबार केला. यात पत्रकाराचा मृत्यू झाला. या घटनेवरून उत्तर प्रदेशातील राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणावरून भाजपाला लक्ष्य केलं आहे. “आपल्या भाचीसोबत होत असलेल्या छेडछेडीला विरोध केला म्हणून पत्रकार विक्रम जोशी यांची हत्या करण्यात आली. माझ्या सहवेदना शोकाकूल परिवारासोबत आहेत. वचन राम राज्याचं दिलं होतं, दिलं गुंडाराज,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

आणखी वाचा- पत्रकार विक्रम जोशी यांच्या कुटुंबाला योगी सरकारने जाहीर केली १० लाखाची आर्थिक मदत

करोनापेक्षा गुन्हेगारीचा व्हायरस जास्त

पत्रकार विक्रम जोशी यांच्या हत्येप्रकरणात बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. “पूर्ण उत्तर प्रदेशात हत्या आणि महिला सुरक्षेसह गंभीर गुन्ह्यांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे. यामुळे स्पष्ट होते की, उत्तर प्रदेशात कायद्याचं नाही, तर जंगलराज सुरू आहे. अर्थात उत्तर प्रदेशात करोना व्हायरसपेक्षा गुन्हेगारांचा क्राईम व्हायरस जास्त झाला आहे. सरकारनं याकडे लक्ष द्यावं,” असं मायावती यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Promised ram raj delivered gunda raj rahul gandhi attacks up govt bmh