गुजरातमध्ये इंदिरा गांधींच्या नावावर असलेली इमारत पाडून पंतप्रधान मोदींच्या नावाने इमारत बांधण्याची तयारी सुरू आहे. यासाठीचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. आता गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर बांधकाम सुरू होईल. गांधीनगरमधील इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन पाडून ‘नरेंद्र मोदी प्रशिक्षण भवन’ बांधण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव गुजरात पंचायत परिषदेच्या बैठकीत आणण्यात आला होता, जो नंतर पासही झाला. ही इमारत खूप जुनी आहे, त्यामुळे ती पाडून नवीन इमारत बांधण्याची परवानगी द्यावी. तसेच, नवीन इमारतीचे नाव पीएम मोदी यांच्या नावावर असावे, असे प्रस्ताव आणताना म्हटले होते.

परिषदेच्या बैठकीत ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची फाइल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पाठवण्यात आली आहे. आता ही इमारत पाडण्याबाबत आणि नवीन नावावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वालाही या प्रस्तावाबद्दल माहिती देण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांना माहिती दिल्यानंतर या प्रस्तावाबाबत एक शिष्टमंडळ देखील पंतप्रधान मोदींना भेटणार आहे.

दरम्यान, हा प्रस्ताव समोर आल्यापासून काँग्रेस त्याला कडाडून विरोध करत आहे. भाजपा राजकारण करत असल्याचं काँग्रेसने म्हटलंय. गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी ट्वीट मध्ये म्हटलंय की, “यांनी नवीन तर काही केले नाही, रेडीमेड विकायला सुरुवात केली! ज्या गोष्टी ते विकू शकत नाही त्यांची नावे बदलतात. सरदार पटेल स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम आहे. आता इंदिरा गांधी पंचायती राज संस्थेचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवले जाईल. राष्ट्रीय नेत्यांप्रती भाजपाचे मन विषाने भरलेले आहे,” असा आरोप त्यांनी केला.

ही इमारत १९८३ मध्ये बांधली गेली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते आणि माधवसिंह सोलंकी मुख्यमंत्री होते. त्यावेळी या इमारतीची पायाभरणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती. म्हणून या इमारतीचे नाव त्यांच्या नावावरून देण्यात आले होते.