शिमला : हिमाचल प्रदेशातील मंडी शहरातील अतिक्रमण केलेल्या सरकारी जमिनीवर बांधलेल्या मशिदीचा भाग पाडण्याची मागणी करत स्थानिकांनी शुक्रवारी जोरदार आंदोलन केले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला.

मशीद व्यवस्थापन समितीला मंडी महापालिकेने ३० दिवसांत अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावली आहे. मशीद २३२ चौरस मीटर जागेवर उभी आहे, तर मंजुरी केवळ ४५ चौरस मीटरसाठी आहे, असे या नोटिशीत म्हटले आहे. ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत आंदोलकांनी सुरुवातीला मंडई बाजारपेठेत परिसरात मोर्चा काढला आणि सेरी मंचावर धरणे धरले. नंतर त्यांनी मशिदीकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याच्या तोफांचा वापर केला.

हेही वाचा >>> Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार

हिंदू संघटनांनी निषेध मोर्चाची हाक दिल्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून मंडीमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. मुस्लीम समुदायाच्या सदस्यांनी गुरुवारी मशिदीचा एक अनधिकृत भाग स्वत: पाडला होता. हे अनधिकृत बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूखंडावर होते. या संदर्भात विभाग आणि महापालिकेने यापूर्वी मशीद व्यवस्थापन समितीला नोटिसा बजावल्या होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू यांनी राज्यातील जनतेला शांतता आणि बंधुभाव राखण्याचे आवाहन केले.