नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आयोजित आंदोलन रोखण्यासाठी अभूतपूर्व नाकाबंदी करण्यात आली होती. हजारो पोलीस आणि निमलष्करी जवानांचा पहारा, मेट्रो स्थानके बंद, मोबाइल इंटरनेटवर निर्बंध, अशा उपाययोजना करूनही हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले. त्यामुळे सकाळपासूनच पोलिसांनी धरपकडसत्र सुरू ठेवले. चार माजी मुख्यमंत्र्यांसह विद्यार्थी, वकील आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
शनिवारी जंतर-मंतरकडे जाणार्या सर्व रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली होती. जंतर-मंतर १.०च्या आंदोलनस्थळापासून मुख्य रस्त्यांपर्यंत अडथळ्यांचे किमान सात-आठ थर उभारण्यात आले होते. कनॉट प्लेसमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तेथून जंतर-मंतरकडे जाणारे संसद मार्ग, खडकसिंह मार्ग, अशोका रोड, जंतर-मंतर रोड, टॉलस्टॉय मार्ग आणि त्यांना लागून असलेल्या सर्व छोट्या गल्ल्याही बंद करण्यात आल्या होत्या. गेल्या आठवड्यात नेहा बोरा आणि डाव्या संघटनांनी आंदोलन केलेला केरळ हाऊसचा परिसरही बंद करण्यात आला होता. जंतर-मंतरकडे जाणार्या सर्व प्रवेशद्वारांसमोर दुहेरी-तिहेरी अडथळे उभारण्यात आले होते.
या परिसरात सुमारे २५ हजारांहून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या परिसरातच सुमारे तीन हजार सुरक्षा जवान तैनात असल्याचे सांगितले जाते. दिल्लीतील सुमारे ४५ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली होती. बससेवाही विस्कळीत झाल्याने आंदोलकांना येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. जनपथ-कर्तव्य पथ चौकापासून चार किलोमीटरच्या परिसरात शुक्रवारी रात्री १० ते शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. तरीही शनिवारी सकाळपासून आंदोलकांचे छोटे-छोटे गट जमू लागले. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी ते मुख्य रस्त्यालगतच्या गल्ल्यांमध्ये पळत होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती.
बंगला साहिबमधून बाहेर पडताच ताब्यात
जंतर-मंतरवरील आंदोलनासाठी दिल्लीतील बंगला साहिब गुरुद्वारात रात्री मुक्काम केलेल्या ७०हून अधिक जणांनाही सकाळी बाहेर पडताच पोलिसांनी ताब्यात घेतले. विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) राष्ट्रीय संयुक्त सचिव आयशी घोष यांनाही बंगला साहिब गोलचक्कर येथे ताब्यात घेण्यात आले. राजीव चौक मेट्रो स्थानकाजवळ सुमारे १०० ते १५० जणांचा जमाव जमला होता. पोलिसांनी तो पांगवला. कनॉट प्लेसमध्येही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले किंवा पांगवण्यात आले.
‘आंदोलन अयशस्वी’
दिल्लीला ’ओलीस’ ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित केलेले आंदोलन अयशस्वी ठरल्याची टीका भाजपने केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे परकीय शक्तींशी हातमिळवणी करून अराजकता पसरवल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला. झुंडशाहीवर लोकशाहीने विजय मिळवला अशा शब्दांत त्यांनी शनिवारच्या घडामोडींचे वर्णन केले. राहुल गांधी व अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशाचा विकास सहन होत नाही. त्यामुळे ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असे टीकास्त्र भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोडले. तर सीजेपी आम आदमी पक्षासाठी काम करत असल्याचा दावा भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केला.
तरुणांचा पाठलाग करून गाडीत बसवले
अशोका रोडवर काही महिला आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या वाहनात बसवण्यात आले होते. मात्र, त्या वाहनात एकही महिला पोलीस कर्मचारी नव्हती. काही वेळाने ही बाब वरिष्ठ अधिकार्यांच्या लक्षात आल्यानंतर दोन महिला पोलिसांना वाहनात बसवण्यात आले. दोन-दोनच्या गटाने येणार्या तरुणांचा पाठलाग करून पोलिस त्यांना ताब्यात घेत होते. ‘‘आम्ही केवळ दोन जण एकत्र असताना जमावबंदी कशी लागू करता?’’ असा सवाल हे तरुण करत होते. मात्र, त्यांनाही ताब्यात घेऊन बसगाड्यांत बसवण्यात आले. दिल्लीतील अनेक ठिकाणी पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील ताब्यात
मध्य दिल्लीतील सर्वोच्च न्यायालय आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा परिसरातही वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही वकिलांना त्यांच्या चेंबरमधूनच ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. या प्रकाराची माहिती सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने (एससीबीए) सरन्यायाधीश सूर्य कांत यांना दिली. एससीबीएचे अध्यक्ष प्रदीप राय यांनी वकिलांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त करून त्यांच्या तातडीच्या सुटकेची मागणी केली. त्यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधला. सरन्यायाधीशांच्या हस्तक्षेपानंतर ताब्यात घेतलेल्या वकिलांना सोडण्यात आले.
दिपकेंना विमानातून अटक केली. दिल्लीतील रस्त्यांवर फिरणार्या तरुणांना अटक केली जात आहे. रेल्वे, मेट्रो, बस सेवा रद्द करण्यात आली आहे. हा प्रकार अन्यायकारक आहे. सत्ताधार्यांकडून लोकशाहीची, राज्यघटनेची हत्या करण्यात आली आहे, या घटनेचा मी निषेध करते. – सुप्रिया सुळे, कार्याध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)
एसआयआर समर्थनार्थ माजी अधिकार्यांचे पत्र
*निवडणुकीत विजय मिळाल्यावर व्यवस्था प्रामाणिक आणि पराभव झाल्यावर ती घोटाळेबाज ठरू शकत नाही, अशा शब्दांत १२४ माजी सनदी अधिकार्यांनी निवडणूक आयोगाची आणि ‘एसआयआर’ची पाठराखण केली.
* आयोगाच्या कार्यपद्धतीवर राजकीय पक्षांच्या निष्ठेच्या आधारे प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे नमूद करत, आरोप करणार्यांनी त्यांचे पुरावे सादर करावेत, असे आव्हानही या अधिकार्यांनी दिले आहे.
आंदोलकांना मारहाण
१ दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी आंदोलकांची गळचेपी केल्याचे चित्र दिसले. टॉलस्टॉय मार्गावर मुरादाबादहून आलेल्या तीन महिला आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी महिला पोलिसांसह किमान २५ पोलिसांचा फौजफाटा त्यांच्याभोवती घेराव घालून उभा होता. ‘‘मी तुमच्याबरोबर यायला तयार असतानाही तुम्ही दमदाटी का करत आहात? तुम्ही माझे कपडे फाडले,’’ असे संबंधित महिला आंदोलक सांगत होती. या तिघींनाही बळजबरीने बसगाडीत बसवून नेण्यात आले.
२ खडकसिंह मार्गावर तीन-चार ‘जेन-झी’ मुलींना अडवण्यात आले. महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तीन-तीन आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठीही पोलीस त्यांच्या मागे धावत असल्याचे चित्र होते. कनॉट प्लेसमध्ये दुपारनंतर आंदोलकांची गर्दी झाली होती. त्यात हिंदुत्ववादी विचारांचे तरुणही सहभागी झाले. त्यांनी आंदोलकांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याने तणाव निर्माण झाला.
३ मात्र, या आक्रमक तरुणांना रोखण्यासाठी पोलीस पुढे आले नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला.दुपारी अशोका रोडवर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ज्याँ द्रेज काही कार्यकर्त्यांसह पोहोचले असता, पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले.
४ दक्षिण दिल्लीतील दिल्ली हाट आणि कनॉट प्लेस यांसारख्या अनेक ठिकाणी काही यूट्यूबर पत्रकारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पत्रकारितेचे ओळखपत्र दाखवूनही काही पत्रकारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
मोदी-शहांच्या डोक्यात पराकोटीची हुकूमशाही
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मनात पराकोटीची हुकूमशाही बसली आहे. या हुकूमशाहीच्या जोरावर देशातील सर्व यंत्रणा काबीज करून मिळवलेली सत्ता मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीतून विरोध करणार्या आंदोलकांना चिरडले जाणार असेल, तर या बेबंदशाहीला देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढले पाहिजे, असा संताप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला.मतचोरीच्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक १ःंूँ जनता पार्टीने (सीजेपी) पुकारलेले आंदोलन दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून मोडून काढण्याचा प्रयत्न केला. सीजेपीच्या नेत्यांसह आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. मोदी-शहांच्या एकाधिकारशाहीवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.
मी माझ्या राजकीय विरोधकांना पूर्णपणे ओळखतो. या लोकांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भित्रेपणा. मोदीजी, तुम्हाला जे करायचे आहे ते करा. दहा हजार, वीस हजार, पन्नास हजार कितीही पोलिसांना बोलवा. सर्व नेत्यांना अटक करा. सर्व तरुणांना अटक करा. आम्ही तुम्हाला घेरत आहोत आणि माघार घेणार नाही. माझे शब्द लक्षात ठेवा, आम्हाला आवश्यक असलेली माहिती आधीच मिळाली आहे. आम्ही संविधानाचे रक्षण करू आणि भारतीय जनतेचा आवाज जपू. भारताच्या तरुणांनो, मला तुमचा अभिमान आहे. – राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते
******
दिल्लीतील परिस्थिती आणीबाणीच्याही पलीकडे गेली आहे. ही आता ‘महा-आणीबाणी’ झाली आहे. शांतता राखणे आणि संयम बाळगणे महत्त्वाचे आहे; मात्र आज जे घडत आहे, ते देशासाठी आणि जनतेसाठी योग्य नाही. आमचा संदेश स्पष्ट आहे-भारत वाचवा, लोकशाही वाचवा!’’– ममता बॅनर्जी, अध्यक्ष, तृणमूल काँग्रेस</p>
******
मोदीजी आतापर्यंत मतांची चोरी करूनच निवडणुका जिंकत होते. आता ते रंगेहाथ पकडले गेले. देशातील तरुणांमध्ये प्रचंड संताप आहे. मोदीजी जिथे अडवतील, तिथेच ठिय्या द्या. त्या ठिकाणाचे जंतर-मंतरमध्ये रूपांतर करा. संपूर्ण देशालाच जंतर-मंतर बनवा. – अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय संयोजक, आम आदमी पक्ष
******
भारत आता लोकशाही राहिलेला देश नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची हुकूमशाही सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या संगनमताने निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आणि सरकारचे बेकायदा स्वरूप उघड होण्याची भीती सत्ताधार्यांना आहे. -प्रियंका गांधी, काँग्रेस खासदार
******
संपूर्ण देशात अघोषित आणीबाणी असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारने पुढील २४ तासांत सर्वांची सुटका केली नाही, तर मला लेह किंवा दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन, उपोषण अथवा मोर्चा काढण्याचा विचार करावा लागेल. – सोनम वांगचुक, पर्यावरणवादी कार्यकर्ते
******
कोणालाही अटक झाली, तर शांत बसणार नाही. अटक होताच कार्यकर्ते पोलीस ठाण्यावर जमा होतील. येथील वातावरण चिघळल्यास त्याला भाजपची राजवट जबाबदार असेल. – आदित्य ठाकरे</strong>, आमदार
ताब्यात घेतलेल्यांची बिनशर्त सुटका करा; दिल्लीतील आंदोलनांवरील कारवाईप्रकरणी संयुक्त राष्ट्राची मागणी
जिनिव्हा : दिल्लीतील मोठ्या आंदोलनादरम्यान आंदोलक, आंदोलनाचे नेते, सामाजिक संघटनांचे सदस्य, वकील आणि पत्रकारांना मोठ्या संख्येने ताब्यात घेतल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने शनिवारी चिंता व्यक्त केली. शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार पूर्णपणे जपावा आणि मनमानीपणे ताब्यात घेतलेल्या सर्वांची तातडीने व बिनशर्त सुटका करावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी भारत सरकारला केले. आंदोलनांवरील निर्बंध आवश्यकतेच्या आणि प्रमाणबद्धतेच्या कठोर निकषांवर आधारित असावेत, असेही कार्यालयाने स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाचे प्रवक्ते थामीन अल-खीतान यांनी निवेदनात म्हटले की, दिल्लीतील आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांना ताब्यात घेतल्याच्या वृत्ताबद्दल कार्यालयाला चिंता आहे. शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार पूर्णपणे जपला जावा आणि त्याची अंमलबजावणी सुनिश्चित केली जावी, असे आवाहन त्यांनी केले.
अल-खीतान यांनी भारतीय अधिकार्यांना आंदोलकांशी व्यवहार करताना सुरक्षा यंत्रणांनी कमालीचा संयम बाळगावा, असेही आवाहन केले. भारताच्या लोकशाही परंपरा व मानवाधिकारविषयक बांधिलक्यांशी सुसंगत पद्धतीने कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. अधिकार्यांनी व्यक्त होणार्या चिंतांवर तोडगा काढण्यासाठी अर्थपूर्ण संवाद साधावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
