Bangladesh Protests: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (दि. ५ ऑगस्ट) पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडला. त्यानंतर ढाकामध्ये जमा झालेल्या आंदोलकांनी आपला मोर्चा पंतप्रधान निवासाकडे वळविला. २०२२ साली ज्याप्रकारे श्रीलंकेत परिस्थिती दिसली होती, तशीच परिस्थिती ढाकामध्ये पाहायला मिळाली. आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरात घुसून धुडगूस घातला. वस्तूंची तोडफोड केली आणि महागड्या वस्तू चोरून नेल्या. शेख हसीना यांच्या घरातील स्वंयपाक घरात शिरत तेथील बिर्याणीवरही आंदोलकांनी ताव मारला. तर काही आंदोलक शेख हसीना यांच्या बेडवर जाऊन उड्या मारताना दिसले. आंदोलकांनी घरातील प्राण्यांनाही सोडले नाही. ससे, मासे, राजहंस असे प्राणीही आंदोलकांनी पळविले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे वाचा >> शेख हसीना पुन्हा एकदा भारताच्या आश्रयाला? इतिहासाची पुनरावृत्ती होणार? ढाकामध्ये सध्या रस्त्यांवर आंदोलकांची तोबा गर्दी झाली असून शेख हसीना पायउतार झाल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे. लोक वाजत-गाजत घोषणाबाजी करत आहेत. पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या गणभवन येथे आंदोलकांनी विजयाचे निशाण फडकविले आहे. सोशल मीडियावर गणभवनचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. ज्यामध्ये आंदोलक घरात हदौस घालत असल्याचे दिसत आहे. काहींनी शेख हसीना यांच्या बेडवर उड्या मारल्या, तर काहींनी जे हाताला मिळेल ते पळवून नेले. टीव्ही, खुर्च्या, टेबल अशा अनेक वस्तू आंदोलकांनी पळवून नेल्या. हे वाचा >> Bangladesh PM Sheikh Hasina : २५ वर्षांपासून सत्तेवर, आर्थिक क्रांतीही घडवली; तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना कोण? आंदोलक शेख हसीना यांच्या निवासस्थानी लूट करत असताना स्वंयपाक घर आणि फ्रिजमधील वस्तूही घेऊन पळाले. स्वंयपाक घरातील बिर्याणी आंदोलकांनी फस्त केली. तसेच फ्रिजमधील मासे आणि इतर खाद्यपदार्थ पळवले. घरात टांगलेल्या तस्वीरींचेही यावेळी नुकसान करण्यात आले. एवढंच नाही तर बांगलादेशचे स्वातंत्र्यसैनिक आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्याचीही आंदोलकांनी तोडफोड केली. शिडी लावून आंदोलक पुतळ्यावर चढले आणि त्यांनी पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच सरकारी कार्यालयातही आंदोलक घुसले आणि तेथील शेख मुजीबूर रहमान आणि शेख हसीना यांच्या तस्वीरी हटविल्या. महिनाभराआधी आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने पाहता पाहता जनआंदोलनाचे स्वरुप घेतले आणि त्याचा रोष सत्ताधाऱ्यांना सहन करावा लागल्याचे यावरून दिसत आहे. आंदोलकांनी शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारलाच उलथवून लावण्याचा निर्धार केला. मागच्या १५ वर्षांपासून या पक्षाचे बांगलादेशमध्ये सरकार आहे.