कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात धरणे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी त्यांची पदकं गंगेत विसर्जित करण्याची घोषणा केली होती. बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या तिघांनीही सोशल मीडियावर एकसारखेच ट्वीट करत आपली याविषयीची भूमिका मांडली होती. त्यानुसार हे कुस्तीपटू पदकं गंगा नदीत विसर्जित करण्यासाठी हरिद्वार येथे पोहोचले आहेत.
हरिद्वारला पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना कुस्तीपटू म्हणाले की, हे सरकार त्यांचं ऐकायला तयार नाही. आरोपी खासदारावर कारवाईदेखील करत नाही, असं असेल तर मग देशासाठी जिंकलेल्या या पदकांचा काय उपयोग. ही पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी आम्ही आलो आहोत. विनेश फोगाट, बजरंग पुनिया, संगीता फोगट, साक्षी मलिक यांच्यासह अनेक आंदोलक कुस्तीपटू हरिद्वारला पोहोचले आहेत. गंगातिरी पोहोचलेल्या कुस्तीपटूंना यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले. कुस्तीपटू येथे ओक्साबोक्शी रडताना दिसले. या कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.




या कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आम्हाला मिळालेली पदकं आम्ही गंगेत विसर्जित करत आहोत. कारण ती गंगामाई आहे. आम्ही जेवढं पवित्र गंगामाईला मानतो तेवढीच मेहनत आम्ही हे पदकं मिळवण्यासाठी केली होती. आम्हाला आमची पदकं प्राणांहून जास्त प्रिय आहेत पण ती आता गंगेत विसर्जित करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही.
कुस्तीपटूंनी म्हटलं आहे की, २८ मे रोजी आमच्या आंदोलनाबाबत पोलीस ज्या प्रकारे वागले ते सगळ्यांनी पाहिलं आहे. आम्हाला अत्यंत क्रूरपणे अटक करण्यात आली, आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेला. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. मात्र आमचं आंदोलन उधळून लावण्यात आलं. पोलिसांनी आम्ही जिथे आंदोलन करत होतो ती जागाही आमच्याकडून हिरावून घेतली. पुढचे दोन दिवस आमच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाला आम्ही वाचा फोडली. जो दोषी आहे त्याविरोधात कारवाईची मागणी केली. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी करतो आहोत. मात्र पोलीस आम्हाला गुन्हेगारांसारखं वागवत आहेत. तर ज्याने लैंगिक शोषण केलं आहे ती व्यक्ती मात्र उजळ माथ्याने समाजात वारतेय आणि आमच्यावर टीका करत आहे.