Shankaracharya Avimukteshwaranand vs Yogi Adityanath: प्रयागराज माघ मेळ्यात सुरु झालेला शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आणि योगी सरकार यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. शंकराचार्यांनी शुक्रवारी वाराणसी येथे पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू असल्याचे ४० दिवसांत सिद्ध करावे आणि पुरावा देऊ न शकल्यास तुम्हाला नकली हिंदू, ढोंगी आणि कपटी मानले जाईल”, असे आव्हानच शंकराचार्यांनी दिले.
…तर तुम्हाला नकली हिंदू, ढोंगी, कपटी मानले जाईल
“मला शंकराचार्य म्हणून दर्जा सिद्ध करणारे प्रमाणपत्र मागण्यात आले होते. मी ते दिले. माझे पुरावे खरे होते, म्हणून त्यांना ते स्वीकारावे लागले. पुरावे मागण्याची वेळ संपली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता ते हिंदू असल्याचा पुरावा द्यावा,” असे आव्हान शंकराचार्यांनी दिले.
“यासाठी तुम्हाला ४० दिवसांचा कालावधी देत आहे. तुम्ही गोभक्त आहात याचा पुरावा द्या. तुम्हाला पुरावा देता आला नाही, तर तुम्हाला नकली हिंदू, ढोंगी, कपटी मानले जाईल. तुम्ही फक्त दिखाव्यासाठी भगवे वस्त्र परिधान केलेत”, असा जोरदार हल्ला शंकराचार्यांनी चढवला.
शंकराचार्यांचे योगींना आव्हान
“गोहत्या बंदीची मागणी करणाऱ्यांना मुख्यमंत्री आणि रामभद्राचार्य यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जात आहे. तुम्ही खरच हिंदू आहात तर गोमातेला राज्य माता म्हणून घोषित करा. राज्यातून होणाऱ्या गोमांस निर्यातीवर बंदी घाला, नाहीतर तुम्हाला गैर हिंदू घोषित करु”, असे शंकराचार्य म्हणाले.
“सर्व संत, महंतांनी १०-११ मार्च रोजी लखनऊमध्ये एकत्र यावे. तिथे कोण हिंदू आहे, कोण हिंदू हृदयसम्राट आहे आणि कोणाला नकली हिंदू घोषित करावे हे ठरवले जाईल. आता नकली हिंदूंचा पर्दाफाश होणार आहे. जेवढे हिंदू आहेत, त्यांच्यासोबत खूप मोठा छळ केला जात आहे. स्वत:ला सादू, योगी, संत आणि भगवाधारी म्हणून घेणारे लोक आणि त्यांचा पक्ष करत आहेत”, असा हल्लाबोल शंकराचार्य यांनी केला.
इतिहासात पहिल्यांदाच शंकराचार्यांकडे पुरावा मागितला
“माफी मागण्याची पण एक पद्धत असते. इथचं स्नान करा, आम्ही तुमच्यावर फुले उधळू, असे आमिष प्रशासन आम्हाला दाखवत होते. येत्या वर्षात ते शंकराचार्यांसाठी प्रोटोकॉल तयार करतील, पण आम्ही नकार दिला. ज्या भिक्षूंना तुम्ही काठ्यांनी मारहाण केली अगोदर त्यांची माफी मागा. जर त्यांनी माफ केले तरच ठीक आहे,” असे शंकराचार्य म्हणाले.
“इतिहासात पहिल्यांदाच राज्यकर्त्यांनी शंकराचार्यांकडे पुरावा मागितला आहे. जगात विक्री होणारे गोमांस तुमच्या राज्यातून निर्यात होत आहे. याला ४० दिवसांत आळा घालून दाखवा, तेव्हाच आम्ही तुम्हाला हिंदू समजू. आणि ४० दिवसांत शक्य नाही झालं तर आम्ही संत महंत लखनऊला येऊन तुमच्यावर टीका करु”, असा इशारा शंकराचार्यांनी यावेळी दिला.
नक्की वाद काय?
१८ जानेवारी रोजी माघी मेळ्यात स्नान करण्यासाठी जात असताना अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांची पालखी पोलिसांनी थांबवली. यावेळी शिष्यांना धक्काबुक्की झाली. यानंतर शंकराचार्यांनी मेळ्याच्या बाहेरच ठिय्या मांडला. प्रशासनाने त्यांना दोन नोटीस बजावत शंकराचार्य असल्याचा पुरावा मागितला. अविमुक्तेश्वरानंद यांनी उत्तरही दिले. यावर योगी आदित्यनाथ यांनी ‘कालनेमि’ (कपटी) असे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, २८ जानेवारी रोजी शंकाराचार्यांनी स्नान न करताच माघ मेळा सोडला.

