नवी दिल्ली : करोना विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त करत शनिवारी सरकारला देशातील लोकांना लस संरक्षण पुरवण्याचा सल्ला दिला. करोनाचा उत्परिवर्तित विषाणू ‘ओमिक्रॉन’ हा ‘डेल्टा’पेक्षाही घातकअसल्याने जगभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी हे वक्तव्य केले. 

देशातील अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या लसीकरणाची आकडेवारी लपवता येणार नाही, असे गांधी यांनी हॅशटॅग ओमिक्रॉन वापरून केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.  ते म्हणाले, करोनाचा उत्परिवर्तित विषाणूचा गंभीर धोका आहे. भारत सरकारने देशवासीयांना लस संरक्षण देण्याबाबत गंभीर असले पाहिजे. त्यांनी सरकारच्या लसीकरणाच्या आकडेवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशाच्या करोना लसीकरण प्रमाणपत्रांमध्ये पंतप्रधानांचे छायाचित्र असते त्यावरून राहुल म्हणाले की ‘एका माणसाच्या छायाचित्रामागे लसीकरणाचे खराब आकडे जास्त काळ लपवले जाऊ  शकत नाहीत.’ देशातील लसीकरणाची आकडेवारी प्रसिद्ध करतानाच राहुल म्हणाले की, देशात केवळ ३१.१९ टक्के पात्र नागरिकांचे आतापर्यंत पूर्णपणे लसीकरण झाले आहे. डिसेंबर अखेपर्यंत संपूर्ण पात्र लोकसंख्यपैकी दररोज २.३३ कोटीनागरिकांचे लसीकरण आवश्यक होते, त्या तुलनेत गेल्या आठवडय़ात देशात दररोज केवळ ६८ लाख नागरिकांचेच लसीकरण झाले आहे.