देशातील जनतेने केंद्र सरकारवर या अगोदरच अविश्वास दाखवला असल्याने संसदेमध्ये त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची गरजच नाही, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी कॉंग्रेस नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारवर केली.
आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस भारतीय जनता पक्ष किंवा कॉंग्रेस यापैकी कोणाबरोबरही आघाडी करणार नाही आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या सहा खासदारांनी यूपीए सरकारविरोधात अविश्वास ठराव सादर केला आहे. या ठरावाला पाठिंबा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्याला उत्तर देताना बॅनर्जी यांनी जनतेने अगोदरच केंद्र सरकारविरोधात अविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे नव्याने अविश्वास ठराव मांडण्याची गरजच नाही, असे त्यांनी सांगितले.
दिल्लीच्या दौऱयावर आलेल्या बॅनर्जी यांनी मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, लालकृष्ण अडवाणी आणि वायएसआर कॉंग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांची भेट घेतली. अविश्वासाचा ठराव मांडणाऱया कॉंग्रेसच्या नेत्यांनीही बॅनर्जी यांची भेट घेऊन या ठरावाला पाठिंबा देण्याची मागणी केली.