पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळजवळ पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या तत्कालीन समाजावादी पक्षावर टीका करताना कब्रस्थान आणि स्मशानभूमीची तुलना करणारं वक्तव्य केलं होतं. बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याच वक्तव्याची आठवण करुन देणारं एक वक्तव्य केलं आहे. आपल्या सरकारने केलेल्या कामांचा दाखला देताना योदगी यांनी हे वक्तव्य केलं आहे. आमच्या सरकारने सरकारी पैसा हा मंदिरांची सजावट, पुन:निर्माणासाठी वापरला. आधीच्या सरकारने केवळ कब्रस्थानांभोवती कुंपणाच्या भींती बांधण्यासाठी पैसा वापरला होता, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.

अयोध्येमधील दिपोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जनतेला आणि आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांना संबोधित करताना योगींनी हे वक्तव्य केलं. “उत्तर प्रदेशमध्ये बदल दिसतोय. पूर्वी राज्यामधील लोकांचा पैसा (सरकारी निधी) का कब्रस्थानांच्या भींती बांधण्यासाठी खर्च केला जायचात. आज हा पैसा मंदिरांचा पुन:विकास आणि सुशोभिकरणासाठी वापरला जातोय. हा विचारांमधील फरक आहे. ज्यांना कब्रस्थानांची काळजी होती त्यांनी त्या ठिकाणी पैसा खर्च केला. ज्यांना धर्म आणि संस्कृतीची चिंता आहे ते सध्या पैसा धर्म आणि संस्कृतीचं जनत करण्यासाठी वापरत आहेत,” असं योगींनी सरकारचं काम कशापद्धतीने केलं जातंय याबद्दल बोलताना सांगितलं.

पुढील वर्षाच्या सुरुवातील होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ यांच्या वक्तव्याला वेगळं महत्वं प्राप्त झालं आहे. यापूर्वी मोदींनी २०१७ साली फतेहपुरमधील भाषणामध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला. सत्ताधारी समाजवादी पक्ष हा भेदभाव करत असल्याचा आरोप करत मोदींनी हे वक्तव्य केलेलं. “एकाद्या गावात कब्रस्थान होत असेल तर तिथे स्मशानभूमी सुद्धा झाली पाहिजे. जर रमझानच्या वेळेस भारनियमन केलं जात नसेल तर दिवाळीच्या वेळेसही केलं जाऊ नये. जर होळीच्या दिवशी वीज असेल तर ईदच्या दिवशीही वीज पुरवठा खंडित होता कामा नये. कोणताही भेदभाव येथे असू नये,” असं मोदी म्हणाले होते.

उत्तर प्रदेशमध्ये राज्य सरकारने ५०० हून अधिक मंदिरांसंदर्भातील विकासकामं हाती घेतली असल्याचं योगींनी सांगितलं. अयोध्येतील राम मंदिर उभारणीतील सर्व अडथळे दूर करण्यात आल्याचंही ते म्हणाले. आता जगातील कोणतीही ताकद हे मंदिर उभारण्यात अडथळा आणू शकत नाही असं म्हणतानाच योगींनी मोदींचं कौतुक केलं.